रत्नागिरी : जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी भर पडली आहे. जिल्ह्यासाठी ३० खाटांच्या अत्याधुनिक एकात्मिक आयुष रुग्णालयास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी १०.५० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांनी या रुग्णालयासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रातून व नागरिकांमधून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.
हे भव्य रुग्णालय रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालयाजवळ उद्यमनगर येथे उपलब्ध असलेल्या जागेत उभारण्यात येणार आहे. मध्यवर्ती ठिकाण असल्याने जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना या आरोग्य सेवेचा लाभ सहज घेता येणार आहे. या एकात्मिक रुग्णालयामुळे रत्नागिरीकरांना विविध पारंपरिक व आधुनिक उपचार पद्धतींचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे. आयुर्वेद योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी, अत्याधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि रुग्णाभिमुख सेवांमुळे जिल्ह्यातील आयुष आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार असून स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार मिळणे शक्य होणार आहे.
या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आयुष उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून आरोग्य क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.-डॉ. भास्कर जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी