व्हेल माशाची उलटी  
रत्नागिरी

Ratnagiri News : १० किलोची कोट्यवधींची 'व्हेल माशाची उलटी' जप्त

खेडमध्‍ये रेल्वे स्थानकाजवळ मध्यरात्री थरार : दापोली कस्टम्सची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड रेल्वे स्थानकाजवळ दापोली कस्टम्स विभागाने मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठी आणि थरारक कारवाई केली आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ चे उल्लंघन करून व्हेल माशाची उलटीची (अंबरग्रीस) बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. तब्बल १० किलोपेक्षा जास्त वजनाची ही व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली असून, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दापोली कस्टम्स विभागाला काही लोक अंबरग्रीसची छुप्या पद्धतीने वाहतूक करत असल्याची पक्की माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून खेड रेल्वे स्थानकाजवळ एका रेनॉल्ट क्विड कारला कस्टम्सच्या पथकाने अडवले. गाडीची झडती घेतली असता त्यात हा प्रतिबंधित मौल्यवान साठा सापडला. व्हेल माशाची उलटी हा वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची १ मधील नोंद क्र. १६९ नुसार प्रतिबंधित पदार्थ असल्याने, कायदा १९७२ च्या कलम २(३२) आणि कलम १६(सी) अन्वये हा साठा जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना खेड येथील माननीय न्यायाधीशांसमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३० जून २०२६ पर्यंत न्यायिक कोठडी सुनावली आहे, तसेच जप्त केलेला मुद्देमाल वन विभागाच्या अधिकृत अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT