खत गोडाऊन रखडल्याने खरीप संकटात 
रत्नागिरी

Ratnagiri News : खत गोडाऊन रखडल्याने खरीप संकटात

केळशीमधील शासकीय खत गोडाऊनचा प्रश्‍न गत ८ महिन्‍यांपासून प्रलंबित

पुढारी वृत्तसेवा

दापोली : केळशी येथील शासकीय खत गोडाऊनाचा प्रश्न गेल्या आठ महिन्यांपासून रखडल्याने त्याचा फटका आता खरीप हंगामातही शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या आडे येथे करण्यात आलेली तात्पुरती व्यवस्था अपुरी ठरत असून खतासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त वाहतूक खर्च आणि वेळेचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

यापूर्वी केळशी येथील शासकीय गोडाऊन केळशी परिसर आंबा उत्पादक संघामार्फत चालविले जात होते. त्यामुळे केळशी, मंदिवली, वांझलोली तसेच मंडणगड तालुक्यातील चिंचघर, जावळे, आंबावली, खरी, साखरी, देवारे, बाणकोट आदी गावांतील शेतकऱ्यांना खत सहज उपलब्ध होत असे. बाजारहाटासाठी केळशीला आलेला शेतकरी त्याचवेळी आवश्यक खत घेऊन जात असल्याने वेळ आणि पैशाची बचत होत होती. मात्र गोडाऊन बंद झाल्यानंतर खतासाठी आडे येथे जावे लागत आहे. युरियाची एक गोणी आणण्यासाठीच सुमारे ३०० रुपयांपर्यंत टेम्पो भाडे मोजावे लागत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. अनेकदा हा खर्च खताच्या किमतीइतकाच होत असल्याने ही व्यवस्था आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याचे शेतकरी सांगतात.

आडे येथील इमारत लहान असल्याने खताचा मोठा साठा ठेवणे शक्य नसल्याने यंदा आंबा उत्पादक संघानेही कमी प्रमाणात खत मागविले आहे. त्यामुळे दूरवरून आलेल्या अनेक शेतकऱ्यांना ‘खत संपले’ असे सांगितले जात असून त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

सध्या आंबा, काजू व नारळ बागांना खत देण्याचा महत्त्वाचा काळ सुरू आहे. मात्र खताचा तुटवडा आणि वाहतुकीचा वाढलेला खर्च यामुळे बागायतदार अडचणीत आले आहेत. संबंधित विभागाकडून अद्याप कायमस्वरूपी पर्यायी गोडाऊनाची व्यवस्था न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून केळशी येथे पूर्ववत शासकीय खत गोडाऊन सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT