रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराचे प्रमाण कमी असून एक घटना घडली होती. त्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच तीन वर्षात ७ बालविवाह झाले आहेत. त्याचे प्रमाणही कमी आहे. यापुढे जिल्ह्यात लैंगिक अत्याचार, बालविवाहाचे आणखीन प्रमाण कमी करण्याचे आदेश दिले आहेत. बालकांचे हक्क, सुरक्षा मिळणे गरजेचे असल्याची माहिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई अर्ध-न्यायिक सुनावणी व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. आजच्या डिजिटल आणि वेगाने बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरील आव्हाने अधिक गंभीर स्वरूपाची होत असून त्यासाठी संवेदनशील, जबाबदार आणि सकारात्मक समाजाता वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे पुराणिक यांनी सांगितले.
आज एकूण ९ प्रकरणावर चर्चा करण्यात आली. ३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, तर उर्वरित प्रकरणावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोक्सोअंतर्गत वर्षभरात ७४ केसेस झाल्या आहेत. ४४ प्रकरणी चार्जशीट दाखल झाल्या आहेत, तर उर्वरित प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जिल्ह्यात एकही बालक शाळाबाह्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गीतांजली घुरी, शुभांगी तांबट, पंकज डेवरे, अतुल देसाई, प्रवीण भुजाले, मीनल जंगम उपस्थित होते.