मंडणगड : मुसळधार पावसामुळे शेणाळे घाटातील देशमुखबाग परिसरात कोसळलेल्या मोठ्या दरडीमुळे गेल्या चार दिवसांपासून बंद असलेला घाटमार्ग अखेर शनिवारी (दि. ११) सायंकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अथक प्रयत्नानंतर रस्त्यावर साचलेली माती, दगड व झाडे हटविण्यात यश आल्याने मुंबई, पुणे, महाड व माणगावकडे जाणारी वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
बुधवारी सकाळपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेणाळे घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळून संपूर्ण मार्ग बंद झाला होता. दरडीचे प्रमाण मोठे असल्याने या मार्गावरील बंद झाली होती. परिणामी, महाड, माणगाव, मुंबई व पुण्याकडे जाणारी वाहतूक मंडणगडपाटमार्गे म्हाप्रळ व अन्य पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली होती. त्यामुळे वाहनचालकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जेसीबी व यंत्रसामग्रीच्या सहाय्याने युद्धपातळीवर दरड हटविण्याचे काम सुरू केले होते. तहसीलदार अक्षय ढाकणे यांनीही प्रत्यक्ष लक्ष ठेवून कामाचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.
सलग चार दिवस सुरू असलेल्या प्रयत्नानंतर अखेर शनिवारी सायंकाळी रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला आणि शेणाळे घाटातून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे मंडणगड व दापोली तालुक्यांचा महाड, मुंबई आणि पुण्याशी असलेला महत्त्वाचा संपर्क पुन्हा सुरळीत झाला असून, नागरिक व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.