देवरुख : संगमेश्वर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूविरोधात मोठी कारवाई करत २ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच ३ लाखांची कार असा एकूण ५ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अज्ञात संशयित फरार झाला आहे.
पोलिसांना पारेख पेट्रोल पंपासमोर संशयित कार उभी असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार छापा टाकला असता एमएच १४ बीके ४१२० क्रमांकाची कार लॉक अवस्थेत आढळली. कारमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या उपस्थितीत केशरयुक्त विमल पान मसाला, तंबाखू तसेच इतर प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई पुढील तपास करत आहेत.