देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीभागातील मेढे तर्फे फुणगूस गावातील बळीराजावर निसर्गाने मोठे अस्मानी संकट आणले आहे. मुसळधार पावसामुळे स्थानिक नदीच्या प्रवाहाने चक्क आपला मार्ग बदलला आहे. नदीचे हे पाणी आता थेट शेतकऱ्यांच्या शेतामधून वाहू लागले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणातील शेतजमीन क्षेत्र पूर्णपणे बाधित झाले आहे.
जमिनीची झालेली दुरवस्था पाहता आता येथे शेती करणेच अशक्य बनल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. चालू मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या पहिल्या पावसात मेढेतर्फे फुणगूस गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात पेरण्या उरकल्या होत्या. मात्र त्यानंतर निसर्गाची अवकृपा झाली. जून महिन्याचा पंधरावडा उलटून गेला तरी पावसाने दडी मारल्याने पेरलेले बियाणे वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. शेतकरी चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करत होते.
अखेर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे दमदार आगमन झाले. रखडलेली पिके तग धरतील या आशेने शेतकरी सुखावला, नदी-नाले पुन्हा वाहू लागले आणि शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले, परंतु हे समाधान फार काळ टिकू शकले नाही. परिसरात धो-धो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीमध्ये पाण्याच्या प्रवाहाचा वेग प्रचंड वाढला.या जोरात आलेल्या पाण्याचा दाब इतका होता की, नदीने आपला मूळ मार्ग सोडला आणि पाण्याचा प्रवाह थेट पिकाऊ शेतातून वाहू लागला. यामुळे संपूर्ण शेताला नदीच्या पात्राचे स्वरूप आले आहे. या वेगवान प्रवाहामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या तर वाहून गेल्याच, पण त्याचसोबत मोठ्या प्रमाणातील शेतजमीन क्षेत्र गंभीररीत्या बाधित झाले आहे. जमिनीची माती खरवडून गेल्याने आता या जागेवर पुन्हा शेती करताणे अत्यंत कठीण झाले आहे.
ही घटना घडली त्यावेळी संगमेश्वर तालुक्याचे सभापती शर्वरी वेल्ये यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली होती. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, परंतु या घटनेला आता काही दिवस उलटून गेले तरीही अद्याप प्रशासनाकडून पंचनामे सुरू झालेले नाहीत.