रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी शासनाने सर्व रेशन कार्डधारकांना ई-केवायसी करण्यासाठी बंधनकारक करण्यात आले. वारंवार ई-केवायसीसाठी मुदतवाढ देऊन ही कित्येक लाभार्थ्यांनी ई-केवायसी अद्याप केली नाही. रत्नागिरी जिल्ह्ययात अडीच लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी अजून ई-केवायसी पूर्ण केली नाही. ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशन कार्डावरून नाव कमी होणार किंवा धान्य बंद होणार आहे.
पुरवठा विभागाने दिलेल्या सूचनांनुसार रेशन कार्डावरील प्रत्येक सदस्यांचे आधार प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे. अनेकदा कुटुंबातील काही सदस्यांची नावे कार्डवर असतात. मात्र, ते प्रत्यक्ष वास्तव्यास नसतात किंवा आधार लिंक नसते. अशा लाभार्थ्यांना शोधण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. ई-केवायसी केल्यास रेशन कार्डधारकांची ओळख आणि इतर माहिती, आधार कार्ड, मोबाईल नंबर तपासला जातो, ई-केवायसी केल्यानंतर लाभार्थ्यांना स्वस्तात धान्य मिळेल. ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने वारंवार केले होते. मात्र, आवाहन करूनही तब्बल अडीच लाख लाभार्थ्यांचे अजूनही ई-केवायसी पेडींग आहे. जर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित लाभार्थ्यांचे नाव कमी होणार तसेच धान्य ही बंद होणार आहे.
5 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण
जिल्हा पुरवठा विभागाने पाठपुरावा केल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील 5 लाखांहून अधिक रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. अडीच लाखांहून अधिक लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे बाकी आहे.
अशी करा ई-केवायसी?
आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानात जावे, रेशन दुकानदारांकडील ई-पॉस मशिनवर आपला अंगठा लावून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, रेशन कार्डवर नाव असलेल्या प्रत्येक सदस्याने वैयक्तिकरीत्या जाऊन अंगठा लावणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन सुविधा असून आपल्या रेशन दुकानदाराशी संपर्क साधून आपले आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे का नाही, याची खात्री करावी.
रत्नागिरी जिल्ह्यात 5 लाखांहून अधिक रेशन कार्डधारकांनी आपली ई-केवायसी पूर्ण केली आहे. तर अडीच लाख लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचे धान्य आपोआप धान्य बंद होईल किंवा रेशन कार्डावरील नाव कमी करण्याची कारवाई होणार आहे.रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी