असगोली समुद्रकिनारी पाण्याला गडद सोनेरी रंग 
रत्नागिरी

Ratnagiri News : असगोली समुद्रकिनारी पाण्याला गडद सोनेरी रंग

बदलामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम; मान्सूनची चाहूल असल्याचे तज्ज्ञांचे मत

पुढारी वृत्तसेवा

गुहागर शहर : गुहागर तालुक्यातील असगोली समुद्रकिनार्‍यावर समुद्राच्या पाण्याला गडद सोनेरी रंगाची छटा आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. किनार्‍यालगत काही भागांमध्ये समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा वेगळ्या रंगाचे दिसत असून, काही ठिकाणी पाणी काळवंडल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे या बदलामागील नेमके कारण काय, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

या संदर्भात सागरी जीव अभ्यासक स्वप्नजा मोहिते यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या सुरुवातीला वादळी वारे, समुद्रातील उंच लाटा आणि पावसाचे पाणी समुद्रात मिसळल्यामुळे समुद्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर घुसळण होते. या प्रक्रियेमुळे समुद्रातील क्षार, सेंद्रिय घटक आणि इतर नैसर्गिक पदार्थ एकत्र येऊन फेस तयार होतो. त्यामुळे किनार्‍यावर फेसाळ पाणी दिसणे ही नैसर्गिक घटना आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, या फेसाळ थराला स्थानिक भाषेत ‘फेणी’ किंवा ‘मान्सूनची चाहूल’ असेही म्हटले जाते. समुद्रातील पाण्याच्या घुसळणीमुळे आणि नैसर्गिक घटकांच्या मिश्रणामुळे काहीवेळा पाण्याला सोनेरी, तपकिरी किंवा गडद रंगाची छटा दिसू शकते.

याशिवाय, मान्सूनपूर्व काळात समुद्राचे पाणी किनार्‍याकडे मोठ्या प्रमाणात ढकलले जात असल्याने अनेक माशांच्या प्रजाती अंडी घालण्यासाठी किनार्‍याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे या कालावधीत मच्छीमारांना चांगल्या प्रमाणात मासेमारी होण्याची शक्यता असल्याचा अंदाजही व्यक्त केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT