Gutka Seized File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : दापोलीत अन्‍न-औषध प्रशासनाच्‍या कारवाईवर प्रश्नचिन्ह

शहरात अनेक पानटपऱ्यांवर खुलेआम गुटखा व पान मसाल्याची विक्री होत असताना केवळ एका ठिकाणीच कारवाई झाल्याने आश्‍चर्य

पुढारी वृत्तसेवा

दापोली : दापोली शहरात अन्‍न व औषध प्रशासन विभागाने बेकायदेशीर पान मसाला विक्रीप्रकरणी कारवाई करत १ हजार ६७८ रुपयांचा विमल पान मसाला जप्त केला. बुधवारी करण्यात आलेल्या या कारवाईत संबंधित विक्रेत्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र या कारवाईनंतर विभागाच्या कार्यपद्धतीवर विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दापोली शहरात अनेक पानटपऱ्यांवर खुलेआम गुटखा व प्रतिबंधित पान मसाल्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत असताना केवळ एका ठिकाणीच कारवाई झाल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकारी दापोलीत दाखल झाले आणि ही कारवाई करण्यात आली, अशी चर्चा शहरात आहे.

तालुक्यातील काही हॉटेल्स, बेकऱ्या आणि स्वीटमार्टमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन, अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थांची निर्मिती तसेच मुदतबाह्य वस्तूंची विक्री होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. मात्र अशा गंभीर बाबींवर व्यापक कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील व्यावसायिकांना तक्रारींच्या कारणास्तव रत्नागिरी येथे बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली असून, यामुळे लहान व्यावसायिकांमध्ये प्रचंड अस्वस्था वाढली आहे.

काही महिन्यांपूर्वी दापोलीतील खाद्यपदार्थांमध्ये अळ्या आढळल्याच्या घटनांनी खळबळ उडवली होती. मात्र त्या प्रकरणांमध्ये पुढे कोणती ठोस कारवाई झाली, याबाबत माहिती सार्वजनिकपणे समोर आलेली नाही. त्यामुळे विभागाच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

राज्याचे अन्‍न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळ आणि नियमभंगाविरोधात कठोर भूमिका घेतली असली तरी दापोलीत त्याच धर्तीवर प्रभावी आणि सर्वसमावेशक कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. मोठ्या व्यावसायिक आस्थापनांपेक्षा लहान व्यावसायिकांनाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही केला जात आहे. दरम्यान, विभागाच्या निवडक कारवाईबाबत काही नागरिक आणि व्यावसायिक वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. अन्न सुरक्षा नियमांची सर्वांसाठी समान अंमलबजावणी व्हावी आणि मोठ्या तसेच लहान आस्थापनांवर एकाच निकषांनुसार कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT