चिपळूण : पिंपरी-चिंचवड येथील विषारी दारू पिऊन झालेल्या दुर्घटनेनंतर रत्नागिरी पोलिस अलर्ट मोडवर आले असून, आता संपूर्ण महामार्गावर ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह विरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे. मुंबई-गोवा महामार्ग, गुहागर-विजापूर मार्गावर पोलिस गस्तीदरम्यान ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करणाऱ्यांवर कायदशीर कारवाई करून थेट गुन्हे नोंदवित आहेत. दररोज या प्रकारचे गुन्हे दाखल होत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
चिपळूण शहर परिसरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हातभट्टी धगधगत आहे. त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. अनेकवेळा हातभट्टीची दारू विकणाऱ्यांवर कारवाई केली जाते आणि शे-दीडशे रूपयांची दारू जप्त करून कागदावर कारवाईचा बहाणा केला जातो. मात्र प्रत्यक्षात धगधगणाऱ्या हातभट्ट्या चालूच राहतात. वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू असून त्याकडे व राज्य उत्पादन शुल्क विभागाने हेतूपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मात्र पुण्यातील दुर्घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. ठिक़ठिकाणी व महामार्गावर ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह विरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. सायंकाळी व रात्रीच्यावेळी मोटारसायकल व चारचाकी वाहनातून किंवा अवजड वाहने घेऊन ड्रॅक अॅण्ड ड्राईव्ह करणाऱ्यांची चौकाचौकात तपासणी केली जात आहे.
चिपळूण शहर परिसर, खेर्डी, अलोरे, शिरगाव, पोफळी, पेढे, परशुराम, सावर्डे आदी भागात ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे व संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. २५ ते ४० वर्षे वयोगटातील हे लोक असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या पुढच्या काळातदेखील ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह विरोधातील मोहीम अधिक तीव्र होईल, असे पोलिस यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
अपघाताला आमंत्रण...
ड्रंक अॅण्ड ड्राईव्हमुळे रात्री-अपरात्री अनेक अपघात होत आहेत. विशेषकरून महामार्गावर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हमुळे अपघात होत असून वाहनचालकच मद्य प्राशन करून गाडी चालवित असल्याने त्यामध्ये बसलेल्या लोकांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे अशा अनेक घटना उजेडात आल्या असून पोलिसांनी ड्रंक अॅण्ड ड्राईव्हविरोधी मोहीम तीव्र करावी, अशी मागणी सर्वसामान्य लोकांतून होत आहे.