Mahavitran Ratnagiri News 
रत्नागिरी

Mahavitran Ratnagiri News | वीजवाहिन्यांच्या विळख्यात शाळा, अंगणवाड्या

१३ अंगणवाड्या, ४० प्राथमिक मराठी शाळांवर धोक्याची टांगती तलवार; सुरक्षेचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

आशिष कारेकर

गुहागर शहर : धोकादायक वीजवाहिन्या व वीजखांब यांच्यामुळे गुहागर तालुक्यातील अंगणवाड्या व प्राथमिक शाळांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न अजूनही सुटलेला नाही. १३ अंगणवाड्या तर ४० प्राथमिक मराठी शाळांवर वीजवाहिन्या व शाळेलगत असलेल्या वीज खांबांमुळे धोक्याची टांगती तलवार कायम असताना महावितरणकडून केवळ यातील मोजक्याच ७ ते ८ शाळांचा विषय तात्पुरता सोडवण्यात आल्याचे सांगण्यात आले. उर्वरित शाळांचे अजूनही धूडूकही नसल्याचे सांगण्यात आले.

अंगणवाड्या व जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा यांची दुरुस्ती, पुर्नबांधणी, शिक्षकांचा अभाव असे असंख्य विषय दरवर्षी चर्चिले जात असतात. आता यात धोकादायक वीजवाहिन्या, वीजखांब यांचा विषय गंभीर बनला आहे. याबाबत पंचायत समितीच्या महिला बालकल्याण व शिक्षण विभागातून माहिती घेतली असता, शाळांवर टांगती तलवार ठरलेल्या वीजवाहिन्या व वीजखांब यांचा प्रश्न अजूनही धूळखात पडल्याचे सांगण्यात आले.

ऐन शिमगोत्सवात २२ मार्च २०१९ रोजी गुहागर तालुक्यातील आंबरे खुर्द येथील मराठी शाळेत मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज उभारत असताना लोखंडी पाईपाचा वीजवाहिन्यांना स्पर्श होऊन सातवीतील १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू तर १२ वर्षांचा विद्यार्थी वीजेच्या धक्क्याने जबर जखमी झाला होता. या दुर्घटनेपासून गुहागर शिक्षण विभागाला जाग आली होती. यानंतर मराठी शाळा व अंगणवाड्यांची पाहणी करून वीजवाहिन्या व वीजखांबांपासून धोका असल्याचे आढळून आले होते. या शाळांजवळील वीजवाहिन्या, वीजखांब इतरत्र हलवण्यासाठी गुहागर पंचायत समिती सभांमध्ये वारंवार हे विषय प्राधान्याने घेण्यात आले होते. वीज मंडळ गुहागर विभागाला पत्रव्यवहारही करण्यात आला होता. मात्र ७ ते ८ शाळांचा प्रश्न सोडवण्याव्यतिरिक्त महावितरणकडून अद्यापही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे वीजवाहिन्या व वीजखांब बदलण्याचा हा विषय गांभीर्याने घेतला जात नसल्याचे दिसून येत आहे.

वीजवाहिन्यांचा धोका असलेल्या जिल्हा परिषद मालकीच्या अंगणवाड्यांमध्ये घर पांघरीसडा, कवठेवाडी, भातगाव-गोळेवाडी, तवसाळ-तांबडवाडी, मळण-तळेकोंड, सुरळ, खोडदे खत मोहितेवाडी, पाटपन्हाळे-गणेशवाडी, वरवेली-मराटवाडी, वरवेली रांजनवाडी, मुंडर आंग्रेवाडी, रूम कूततूक-कावणकरवाडी शिंगवणवाडी, कोतळूक-किरवलेवाडी या शाळांचा समावेश आहे.

जिल्हा परिषद मराठी शाळांच्या छतांसह बाजून वीजवाहिन्या गेल्या आहेत. यामध्ये आंबरे खुर्द, कर्दे नं २, दोडवली, पिंपर-सहणवाडी, आबलोली नं. १, आबलोली-पाणदेवाडी, खोडदे-खापले डिंगणकरवाडी, असोरे, शिवणे नं. २, कोंडयेगुरी उर्दू, पालशेत-काळेवठार, मळण नं. १, वेलंब नं. १, मळण-तळेकोंड, पांगारीतर्फे वेलंब-खांबेवाडी, जानवळे नं. २, वेलंब नं. ४, या शाळांचा समावेश आहे. कारूळ, जामसुत-पांढेवाडी, पिंगरे नं. १, भातगांव वडाची, भातगाव-गोळेवाडी, कोळवली नं. १, खोडदे-मोहितेवाडी, खोडदे-निवातेवाडी, असोरे, पाचैरीसडा नं. २, मासू नं. १, पालशेत काळेवठार, पालशेत नं. १, वेलंब नं. १, मळण तळेकोंड, जानवळे नं. ३ या शाळांजवळ वीजखांब आहेत.

गुहागर पंचायत समिती महिला बालकल्याण विभागातर्फे व शिक्षण विभागाकडून या संदर्भात महावितरण गुहागर कार्यालयात वारंवार पत्रव्यवहार केल्याचे सांगण्यात येते. मात्र महावितरण गुहागर कार्यालयाकडून याबाबत ठोस कार्यवाही नसल्याने या धोकादायक वीज वाहिन्या व वीजखांब जैसे थे आहेत. आणखी एखादी अपघात घडण्याची वाट महावितरणचे अधिकारी पहात आहेत का? असे पालक वर्गातून बोलले जात आहे.

सा. बा. विभागाविरोधात नगर परिषदेत तीव्र निषेध राजापूर

नगर परिषद या स्वायत्त संस्थेच्या अस्तित्वालाच आव्हान देणारी तसेच राजशिष्टाचाराचा अपमान करणारी वर्तणूक केल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात नगर परिषदेत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शुक्रवारी झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील ठराव एकमुखी मंजूर करण्यात आला. नगरसेवक महेश शिवलकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे हा विषय सभागृहात मांडला. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभागृह सदस्य तसेच प्रशासनाचा झालेला उपमद लक्षात घेऊन सभागृहाने तीव्र नाराजी व्यक्त केली. भविष्यात संस्थेचा सन्मान अबाधित राहावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीबाबतचे विवेचन राज्याचे बांधकाम व राजशिष्टाचार मंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णयही घेण्यात आला.

ही सभा नगराध्यक्षा अॅड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी अॅड. जमीर खलिफे, सुलतान ठाकूर यांच्यासह अनेक सदस्यांनी भूमिका मांडल्या. तर विरोधी गटनेते अॅड. राहुल तांबे, पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, दिलीप चव्हाण, दिलीप अमरे, उर्मिला बावकरकर आदी सदस्यांनीही ठोस मते मांडली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सभागृह सजग असल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT