सोनवी नदीवरील नव्या पुलाची एक मार्गिका  
रत्नागिरी

Ratnagiri News : सोनवी नदीवरील नव्या पुलाची एक मार्गिका

तब्बल १८ वर्षे रखडलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त, मार्ग अधिकृतपणे अद्याप सुरू नाही

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर बसस्थानकाजवळील सोनवी नदीवरील नव्या पुलाच्या एका मार्गिकेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या पुलावरून एकेरी वाहतुकीला सुरुवात करण्यात आली आहे. तब्बल १८ वर्षे रखडलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त होऊ लागल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच वाहनचालकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. मात्र हा मार्ग अधिकृत सुरू करण्यात आला असल्याचा फलक लावण्यात आलेला नाही.

कोकणाच्या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. संगमेश्वर येथील सोनवी नदीवरील जुना पूल अरुंद आणि अपुरा ठरत असल्याने अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होत होती. विशेषतः पर्यटन हंगाम, सणासुदीचे दिवस आणि सुट्ट्यांच्या काळात या परिसरात वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नव्या पुलाची उभारणी हा स्थानिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला होता.

२००८ मध्ये या पुलाच्या बांधकामास प्रारंभ झाला. मात्र विविध प्रशासकीय अडथळे, तांत्रिक गुंतागुंत आणि आर्थिक कारणांमुळे प्रकल्पाचा वेग वारंवार मंदावत गेला. परिणामी हा प्रकल्प तब्बल दीड दशकाहून अधिक काळ अपूर्ण अवस्थेत राहिला. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

गेल्या काही वर्षांत पुलाच्या कामाला गती देण्यात आली आणि आता एका मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीसाठी ती खुली करण्यात आली आहे. यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून संगमेश्वर शहर परिसरातील वाहतूक कोंडीवरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे. नव्या पुलामुळे प्रवास अधिक सुरक्षित, गतिमान आणि सुलभ होणार असल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक व्यापाऱ्यांनीही या निर्णयाचे स्वागत करत, वाहतुकीतील सुरळीतपणाचा सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थकारणावरही होईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे तसेच अन्य पूरक कामांचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रयत्नशील आहे. संपूर्ण पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवासाचा वेग आणि सुरक्षितता आहे. संपूर्ण पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवासाचा वेग आणि सुरक्षितता अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT