रत्नागिरी : सवलतधारकांसाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबीलिटी) कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या १ ऑगस्टपर्यंत कार्ड काढून घ्यावे, अन्यथा ज्येष्ठ नागरिक, महिलांना कार्डशिवाय सवलत मिळणार नाही असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख सवलतधारकांनी एनसीएमसी कार्ड काढून घेतले आहे. अद्याप ६ लाख जणांनी कार्ड काढले नाही. त्यामुळे सवलतधारकांनो लवकरात लवकर स्मार्ट कार्ड काढा, अन्यथा एसटी बसेसमध्ये सवलत मिळणार नाही.
बोगास आधार कार्ड दाखवून प्रवास करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने आता आधारऐवजी सवलतधारकांना एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. मागील तीन महिन्यापूर्वीच कार्ड नोंदणी सुरू झाली आहे. रत्नागिरी बसस्थानकासह सह विविध ठिकाणी कार्ड काढण्याचे काम सुरू आहे. सकाळी ९.३० ते ५ यावेळेत स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत १ लाख सवलतधारकांनी स्मार्ट कार्ड काढले आहे. दरम्यान, काही दिवसांपासून कार्ड काढण्यासाठी गर्दी कमी झाली होती. आता १ ऑगस्टपासून स्मार्ट कार्ड सक्ती करण्यात येणार असल्यामुळे पुन्हा एकदा कार्ड काढण्यासाठी सर्वच बसस्थानकावर सवलत धारकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात ५१ लाख कार्ड नोंदणी, २५ लाख स्मार्ट कार्डचे वितरण
राज्यातील सुमारे ५१ लाख सवलतधारकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी २५ लाख स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित कार्ड लवकरच वाटप होईल. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक कार्ड वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जादा शुल्क आकारणाऱ्या कार्ड विक्री केंद्रावर कारवाई होणार असल्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.