निवेली गाव अखंडपणे जपतेय सामूहिक शेती परंपरा  
रत्नागिरी

Ratnagiri News : निवेली गाव अखंडपणे जपतेय सामूहिक शेती परंपरा

सामाजिक एकोपा आणि कृषी संस्कृतीचे घडतेय अनोखे दर्शन

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : आधुनिकतेच्या वाढत्या प्रभावामुळे ग्रामीण भागातील अनेक पारंपरिक प्रथा, रूढी आणि सामूहिक उपक्रम काळाच्या ओघात लोप पावत असताना राजापूर तालुक्यातील निवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी हे गाव आजही आपल्या परंपरांचे जतन करत आदर्श निर्माण करत आहे. गावातील ग्रामस्थांनी गेली अनेक वर्षे सामूहिक शेतीची परंपरा अखंडपणे जपली असून, सामाजिक एकोपा आणि कृषी संस्कृतीचे अनोखे दर्शन येथे घडते.

सर्वत्र भातशेतीचे क्षेत्र कमी होत असताना निवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी मात्र याला अपवाद ठरली आहे. गावातील ग्रामस्थ एकदिलाने एकत्र येऊन सार्वजनिक शेती करतात. त्याचबरोबर वैयक्तिक शेतीलाही तेवढेच महत्त्व देण्यात येते. सुमारे १०३ कुटुंबे असलेल्या या गावातील तब्बल ९० टक्के कुटुंबे आजही भात आणि नाचणीची शेती करीत आहेत.

चव्हाणवाडीची विशेष ओळख म्हणजे येथील सामूहिक शेती. या शेतीतून उत्पादित होणारा तांदूळ गावातील पारंपरिक शिमगा उत्सवातील सार्वजनिक निवेद (पोस्त) तयार करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे या उपक्रमाला केवळ कृषीच नव्हे तर धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. ग्रामस्थांच्या मते, सामूहिक श्रमातून पिकविलेल्या धान्याची चव व समाधान काही वेगळेच असते.

गावातील कोणताही सार्वजनिक उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि सर्वांच्या सहभागातून साजरा केला जातो. रूढी, परंपरा, चालीरीती व सामाजिक एकोप्याचा वारसा जपत चव्हाणवाडीने परिसरात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. बदलत्या काळातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी घट्ट नाते जपणारे हे गाव ग्रामीण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

पिकवलेला भात शिमगाेत्सवात नैवेद्यासाठी वापरण्‍याची परंपरा

तालुक्यातील चव्हाणवाडी हे गाव आधुनिकतेच्या युगातही आपली कृषी व सांस्कृतिक ओळख जपताना दिसत आहे. सामूहिक श्रमातून पिकविलेला भात शिमगाेत्‍सवात नैवेद्यासाठी वापरण्याची अनोखी परंपरा आजही येथे कायम असून सामाजिक एकोप्याचा आदर्श चव्हाणवाडीने संपूर्ण परिसरासमोर ठेवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT