रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 90 टक्के काम पूर्ण झाले असून आरवली ते तळेकांटे पट्ट्यामध्ये चार ते पाच ठिकाणी थोडी-थोडी कामे शिल्लक असून नोव्हेंबरपर्यंत ही कामे पूर्ण होऊन डिसेंबर जिल्ह्यात महामार्गाच्या दोन्ही लेन पूर्ण होण्याची चित्र दिसत आहे. ठेकेदाराकडून वेगाने कामे सुरू असली तरी येणार्या पावसात या कामाचा वेग धिमा होण्याची शक्यता आहे. काही पुलांची कामे जुलैअखेर पूर्ण होणार असली तरी गणपतीपूर्वी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा मुहूर्त टळणार आहे.
मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास संपूर्ण महामार्ग पूर्ण झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कशेळीपासून आरवलीपर्यतचा महामार्ग पूर्ण झाला आहे. काही किरकोळ व डागडुजी कामे या भागात सुरू आहेत. आरवली ते तळेकांटे हा टप्पा आजही त्रासदायक ठरला आहे.
संगमेश्वर पैसाफंड हायस्कूलसमोरील ब्रीजवरून दुतर्फा वाहतूक सुरू असली तरी याठिकाणी रस्ता पूर्ण झालेला नसून काही कामे अद्याप सुरू आहेत. त्यापुढे संगमेश्वर स्टॅडसमोरील मुख्य पुलाचे काम पूर्णत्वाला गेले आहे रत्नागिरीबाजुकडील जोडरस्त्याचे अर्धेकाम सुरू आहे. त्यामुळे पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. याठिकाणी सर्व्हीस रोडचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. गणेशोत्सवापूर्वी मुख्यपुलाच्या जोडरस्त्याचे काम पूर्ण झाल्यास दोन्ही लेन सुरू करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभाग प्रयत्नशील आहे.
संगमेश्वरनजीकच ओझरखोल येथे जुन्या पुलालगत रस्त्याचे काँक्रीटचे काम अर्धवट ठेवण्यात आले असून हा भाग अपघाताला कारणीभूत ठरणार आहे. कुरधुंडा गावाजवळील जवळपास शंभर मीटरचा काळा कातळ फोडण्यात ठेकेदाराला यश आले आहे. याठिकाणी एक लेन पूर्ण झाली आहे. एक लेन पूर्ण सपाट करण्यात आली असून, काँक्रीटकरणाचे काम शिल्लक आहे. महिनाभरात याही लेनवरुन वाहतूक सुरू होण्याची शक्यता दिसून येत आहे.
रत्नागिरीच्या दिशेने येताना कोळंबे गावाजवळील पुलाचे काम पूर्णत्वाला गेले आहे. जोडरस्त्याचे कामही पूर्ण झाले असून त्यावर काँक्रीट अस्तरीकरणाचे काम शिल्लक आहे. पुलाच्या दोन्ही बाजुने हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने ठेकेदाराने वेग दिल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी ब्रीज खालून देवरुखच्या दिशेने जाण्यासाठी सर्व्हीस रोडचे कामही धीमे सुरू आहे.
वांद्री बसथांब्याजवळ असणार्या पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी एका बाजुच्या जोडरस्त्याचे काम सुरू आहे. याठिकाणी एक लेन सुरू करण्यात आली आहे. हे काम पूर्ण होण्यास एक महिन्याहून अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. याठिकाणी सर्व्हिस रोडचे कामही शिल्लक आहे.
महामार्गावरील तळेकांटे हा भाग महत्वाचा आहे. जवळपास शंभर मीटर दोन्ही लेन तयार व्हायच्या आहेत. याठिकाणी सध्या डोंगर कटाई सुरू आहे. त्यामुळे या भागात गणपतीपर्यत काँक्रीटचा रस्ता होताना कठिण आहे. नोव्हेंबरपर्यंत याठिकाणी दोन्ही लेन पूर्णत्वाला जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाचा भाग पूर्ण होण्याची चिन्ह आहेत.