रत्नागिरी : उन्हाळी सुट्ट्या लवकरच संपणार असून, येत्या १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. महिनाभर बंद असलेली शाळा-महाविद्यालये गजबजणार आहेत. त्यामुळे एस.टी.महामंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षीही शालेय विद्यार्थ्यांना शाळा,
महाविद्यालयातच एसटीचे पासेस देण्यात येणार आहे. त्याचे नियोजन जिल्ह्यातील आगारातून सुरू झाले आहे. ज्या शाळांनी मागणी केल्यास त्यांनाही अर्ज, पासेस देण्यात येईल. पासमध्ये मुलींना मोफत तर मुलांना ६६ टक्के सवलत मिळणार आहे.
शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दररोज हजारो-लाखो विद्यार्थी एसटी बसेसमधून प्रवास करत असतात.त्यामुळे एसटीला चांगले उत्पन्न ही मिळते. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना ५० टक्के सवलत आहे. तसेच दररोजचा प्रवास करणाऱ्या शाळा-महाविद्यालयातील मुला-मुलींना पासमध्ये विशेष सवलत देण्यात येते. दरम्यान, आता एसटी महामंडळाच्या बसेसमुळे ग्रामीण भागातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध सवलतीचे पास दिले जातात.आता या पासेससाठी एसटी महामंडळात जायची गरज राहणार नाही. आता थेट शाळेतच विद्यार्थ्यांना पासेस देण्याची सोय करण्यात आली आहे.
रांगेत उभे राहण्याची गरज नाही
घरापासून शाळेपर्यंत जाण्यास शासनाने विद्यार्थ्यांना एसटी माध्यमातून ६६ टक्के इतकी सवलत दिली आहे. म्हणजे केवळ ३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटीचे पासचे वितरण केले जाते. एसटीच्या पास केंद्रावर जावून रांगेत उभे न राहता आता शाळा, महाविद्यालयातच पासेस मिळणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही.
पासेससाठी आगारप्रमुखांना द्यावे लागणार पत्र
शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना पासेससाठी त्यांना बोनाफाईड व एक छायाचित्र द्यावे लागणार आहे. तसेच मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांना त्यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिंनींना मोफत बस पास द्यायचे असल्यास तसे पत्र आगारप्रमुखांना द्यावे लागणार आहे. मागणी केल्यास अर्ज, पासेस एसटी विभागाकडून दिले जाते.