रत्नागिरी : राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमित तिकीटदरात १३.५६ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली असून, ही दरवाढ १८ जुलैपासून लागू झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीहून मुंबई, बोरीवली, पुणे, कोल्हापूर तसेच जिल्ह्यांतर्गत राजापूर, चिपळूण, लांजा आदी मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. एकूणच प्रवासी वर्गातून नाराजीचा सूर आहे.
लांब पल्ल्याच्या मार्गांवर १९ ते २२ रुपये, तर जिल्ह्यांतर्गत काही मार्गांवर ३ ते १४ रुपयांपर्यंत भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांत नाराजीचे वातावरण आहे. डिझेलच्या वाढत्या किमती, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन व विविध भत्त्यांतील वाढ, वाहनांच्या सुट्या भागांचा खर्च, टायर तसेच देखभाल खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. याचवेळी यापूर्वी लागू असलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. शनिवारपासून नव्या दरानुसार तिकीट आकारणी सुरू झाली आहे.