जिल्‍ह्यात एसटी प्रवाशांमध्‍ये ५० टक्‍क्‍यांनी झाली घट 
रत्नागिरी

Ratnagiri News : जिल्‍ह्यात एसटी प्रवाशांमध्‍ये ५० टक्‍क्‍यांनी झाली घट

कार्ड सक्‍तीला डिसेंबरपर्यंत ब्रेक; रत्‍नागिरी विभागाच्‍या उत्‍पन्नावरही परिणाम; राज्‍यभरातून एसटी महामंडळास २४० कोटींचा तोटा

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : महिलांसह ज्‍येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड सक्‍ती केल्‍यामुळे जिल्‍ह्यासह राज्‍यभरात त्‍याचा फटका एसटी महामंडळास बसला आहे. सप्‍टेंबर, ऑक्‍टोबर महिन्‍यात प्रवाशांची संख्या कमी होऊन उत्‍पन्नातही घट झाली आहे. एसटी महामंडळास २४० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, तर रत्‍नागिरी विभागातील प्रवाशांची संख्या तब्‍बल ५० टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे.

त्‍यामुळे जिल्‍ह्यासह राज्‍यभरात ३१ डिसेंबरपर्यंत एनसीएमसी कार्ड नसले तरी महिलांना एसटी बसमध्ये सवलतीच्‍या दरात प्रवास करता येणार आहे. तांत्रिक अडचणी आणि ग्रामीण भागात महिलांपर्यंत पुरेशी माहिती न पोहोचल्‍याने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

अपुऱ्या पूर्वतयारीअभावी घेतलेला एक धोरणात्‍मक निर्णय राज्‍य महामंडळास अंगलट आला आहे. कार्ड सक्‍ती केल्‍याने त्‍याचा परिणाम महामंडळाच्‍या तिजोरीवर झाला आहे. सप्‍टेंबर महिन्‍याच्‍या तुलनेत ऑक्‍टोबर महिन्‍यात एसटीच्‍या तोट्यात तब्‍बल १५० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. अवघ्या महिनाभरातील एकूण २४० कोटी रुपयांहून अधिक नोंदवला गेला आहे.

मागील दोन महिन्‍यांत रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील लाखो प्रवाशांची संख्या घटली आहे. उत्‍पन्न ही घटले आहे. यामागे स्मार्ट कार्ड सक्‍तीचेच कारण दिले जात आहे. रत्‍नागिरी जिल्‍ह्यात सप्‍टेंबरच्‍या तुलनेत ऑक्‍टोबरमध्ये लाखोंच्‍या संख्येने प्रवासी संख्या घटल्‍याने रत्‍नागिरी विभागाचे कोट्यवधीचे उत्‍पन्न घटले आहे. त्‍यामुळे एसटी महामंडळाने कार्ड सक्‍तीला ब्रेक दिला आहे.

राज्‍यभरात ४३ टक्‍केच महिलांकडे कार्ड आहे. उर्वरित ५७ टक्‍के महिला प्रवाशांकडे कार्ड नाही. तांत्रिक व व्‍यावहारिक त्रासामुळे संतप्‍त झालेल्‍या महिला, ज्‍येष्ठ प्रवाशांसह त्‍यांच्‍यासोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबीयांनी व इतर प्रवाशांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरवली आहे.

एनसीएमसी कार्डमध्ये आहेत ‘या’ अडचणी

गावखेड्यातील महिलांपर्यंत एनसीएमसी कार्ड काढूनच सवलतीचा प्रवास करता येणार असल्‍याबाबत तसेच रिचार्जबाबत पुरेशी माहिती न पोहोचल्‍याने अनेकांना नोंदणी करणे शक्‍य होत नव्‍हते. आता जिल्‍ह्यातील ग्रामपंचायत स्‍तरापर्यंत विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, स्‍थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटनांची मदत घेतली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT