देवरुख : देवरुख आगाराच्या एका लांब पल्ल्याच्या बसच्या बॅटरीचा संगमेश्वर आगारातच रात्री साडेआठच्या सुमारास प्रचंड, कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. या आवाजाने संपूर्ण आगार हादरून गेले आणि प्रवाशांमध्ये एकच धांदल उडाली. महामंडळाच्या या निकृष्ट दर्जाच्या देखभालीमुळे आणि संगमेश्वर स्थानकातील तांत्रिक व्यवस्थेच्या दिवाळखोरीमुळे प्रवाशांना फटका बसत आहे.
रविवारी रात्री संगमेश्वर आगार परिसर प्रवाशांनी खचाखच भरलेले होते. देवरुख आगाराची एम.एच. १४ एल.एक्स. ७१४२ ही देवडे - बोरिवली जाणारी गाडी आगारात उभी होती. अचानक या गाडीतून प्रचंड आवाज झाला. यामुळे भयभीत झालेले प्रवासी एसटी बसमधून बाहेर पडू लागले, तर आजूबाजूचे लोक व आगारात बसलेले प्रवासी आवाजाच्या दिशेने धावू लागले. यावेळी बसच्या बॅटरी कक्षातून प्रचंड धूर आणि रासायनिक पाणी बाहेर फेकले जात असल्याचे दिसून आले. हा स्फोट झाला तेव्हा बसचे चालक व वाहक नियंत्रण कक्षात नोंद करण्यासाठी गेले होते. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जीवाची पर्वा न करता तत्काळ बॅटरीचा कक्ष उघडला आणि मुख्य सप्लाय कीट बाहेर काढला, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला. स्फोट इतका तीव्र होता की बॅटरीच्या भागाचे तुकडे झाले. नव्या कोऱ्या गाडीची बॅटरी फुटतेच कशी? महामंडळात निकृष्ट दर्जाचे सुटे भाग वापरून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा थेट आरोप प्रवाशांनी केला आहे.