रत्नागिरी : येत्या काही दिवसांतच उन्हाळी सुट्टी संपणार आहे. त्यामुळे नवविद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागाची तयारी अंतिम टप्प्यावर आली आहे. येत्या १५ जूनला जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शाळेत मुलांचा किलबिलाट पाहावयास मिळणार आहे. यंदाच्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात १० हजार ९१ विद्यार्थी पहिलीमध्ये प्रवेश घेणार असून पहिल्याच दिवशी शिक्षणाचा श्रीगणेशा करणार आहेत. पहिलीत प्रवेश करणाऱ्या नवगत विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात, वाजतगाजत स्वागत केले जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.
शासनाच्या पहिले पाऊल या संकल्पेअंतर्गत पहिलीमध्ये दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा कागदावर घेऊन या क्षणाची आठवण जतन केली जाणार आहे. तसेच त्यांना मोफत पाठपुस्तके, गणवेश वाटप होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात अत्यंत उत्साहात करण्यासाठी रत्नागिरीचा शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये १०० टक्के पटनोंदणी व्हावी, यासाठी शिक्षण विभागाकडून महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत.
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनांतर्गत दर्जेदार भोजन देण्यात येणार आहे. मागील काही दिवसांत जिल्हा परिषद शाळांचा पट कमी होत असला, तरीही शिक्षकांनी आपल्या शाळेतील पट राखण्यासाठी उन्हाळी सुट्टीत विशेष प्रयत्न केले आहेत. त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पहिलीत १० हजार ९१ विद्यार्थी दाखल होणार आहेत. त्यामुळे शाळा सजवून, विद्यार्थ्यांना मिठाई वाटून, ढोलताशांच्या गजरात स्वागत होणार आहे.