आठवडा बाजारात उभारणार आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स 
रत्नागिरी

Ratnagiri News : आठवडा बाजारात उभारणार आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स

नगरसेविका वर्षा ढेकणे यांच्या पाठपुराव्याला यश; शासनाकडून ७ कोटींचा निधी मंजूर

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : शहराच्या व्यापारी विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला असून, आठवडा बाजार येथील विद्यमान शॉपिंग सेंटरच्या जागेवर अत्याधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी राज्य शासनाने तब्बल ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १५ मधील आरक्षण क्रमांक ५८ वरील हा प्रकल्प नगरसेविका तथा भाजपा महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

वर्षा ढेकणे यांनी या प्रकल्पासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर आमदार चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची शिफारस केली. त्यास मान्यता मिळाल्यानंतर नगरविकास विभागाने ‘नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान’ या योजनेतून ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करत अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च राज्य शासन उचलणार असून निधी थेट रत्नागिरी नगर परिषदेला उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आधुनिक व्यापारी गाळे, प्रशस्त मोकळी जागा व नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यामुळे आठवडा बाजार परिसराचा कायापालट होण्यासह व्यापाऱ्यांना अधिक सुरक्षित व सुसज्ज व्यवसायाची जागा मिळणार आहे. तसेच नागरिकांनाही आधुनिक खरेदी केंद्राची सुविधा उपलब्ध होणार आहे.

शासनाने निधी मंजूर करताना कामाच्या दर्जाबाबत आणि पारदर्शकतेबाबत कडक अटी घातल्या आहेत. संपूर्ण काम ई-निविदा प्रक्रियेद्वारे करण्याचे बंधन घालण्यात आले असून काम सुरू करण्यापूर्वी जागेची छायाचित्रे नोंदवणे, कामाचे त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक लेखापरीक्षण (थर्ड पार्टी ऑडिट) करणे आणि निधीचा विनियोग नियमानुसार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी रत्नागिरी नगर परिषदेवर सोपवण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्ण कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असेल. शॉपिंग कॉम्प्लेक्स सार्वजनिक जागेवरच उभारण्यात यावे तसेच ते मंजूर विकास आराखड्यानुसार असावे, अशी अटही शासनाने घातली आहे.

या निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आठवडा बाजारातील आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, व्यापारी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT