मंडणगडमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावतेय 
रत्नागिरी

Ratnagiri News : मंडणगडमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावतेय

रोजगारासाठी महानगरामध्ये विस्तापित होण्याचे दृष्य परिणाम; शैक्षणिक व्यवस्थेसाठी चिंतेची बाब

पुढारी वृत्तसेवा

मंडणगड : रोजगार, व्यवसाय, शिक्षण आदी विविध कारणांनी ग्रामीण भागातून महानगरांमध्ये विस्तापित होण्याचा नागरिकांचा कल कोकणात बऱ्याच अंशी पाहायला मिळतो. मंडणगड तालुक्यात हे प्रमाण अधिक आहे. काही दशकांपासून सुरू झालेल्या या क्रियेचे प्रमाण उत्तोरोत्तर वाढत राहिले व त्याचे दृष्य परिणाम आताच्या ग्रामीण भागांमधील शैक्षणिक व्यवस्थेमध्ये प्रकर्षाने दिसू लागले आहेत. ग्रामीण भागांमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची कमतरता जाणवू लागली असून येथील शैक्षणिक व्यवस्थेसाठी ही चिंतेची बाब ठरत असल्याचे चित्र आहे.

घटत्या विद्यार्थी संख्येचे उदाहरण द्यायचे झाल्यास, शिक्षण विभागाच्या यंदाच्या सर्व्हेनुसार, मंडणगड तालुक्यात मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमातील शाळांमध्ये पहिलीच्या वर्गाकरिता १७५ मुले व १९७ मुली असे एकूण ३७२ विद्यार्थी प्रवेशपात्र आहेत. २०१६ साली हाच आकडा ६५० इतका होता. म्हणजेच ५० टक्के विद्यार्थ्यांची घट हे येथील स्थलांतराचे बोलके चित्र आहे. याशिवाय माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना देखील विद्यार्थी संख्येचा विषय चिंतेचा ठरला आहे. विद्यालयीन शिक्षणासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांची गावांमध्ये शोधमोहीम राबवावी लागते हे येथील वास्तव आहे. येथील नागरिक रोजगार, शिक्षण व व्यवसायासाठी मुंबई, पुणे तसेच इतर महानगरांमध्ये स्थायिक झाले आहेत. परिणामी अनेक गावांतील लोकसंख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. त्याचा थेट परिणाम ग्रामीण शाळांवर दिसून येतो. एकेकाळी विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या शाळांमध्ये आज मोजकेच विद्यार्थी शिल्लक राहिल्याची वस्तुस्थिती अनेक गावांत पाहायला मिळते.

शासनाने शिक्षण क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल केले आहेत. डिजिटल शिक्षण, आधुनिक सुविधा, इंग्रजी माध्यमाच्या संकल्पना, विविध शिष्यवृत्ती योजना यामुळे जिल्हा परिषद शाळा, विद्यालयांना गुणवत्तेची नवी दिशा मिळाली आहे. तसेच एमआयडीसी आणि विविध उद्योग प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मंडणगडसारख्या ग्रामीण तालुक्यातून स्थलांतर थांबवण्यासाठी हे प्रयत्न अपुरे पडताना दिसतात. काही अंशी विद्यार्थ्यांचा कल नजीकच्या तालुक्यातील शहरांमधील शाळांत प्रवेश करण्यावर आहे, त्यासंदर्भात शालेय शिक्षणपद्धतीत गुणवत्ता अंगीकारणे हे शाळांनी स्वीकारणे आवश्यकच ठरेल.

कमी झालेली विद्यार्थी संख्या हि येथील व्यवस्थेस विचार करायला लावणारी आहे. मंडणगड तालुक्यात स्थानिक रोजगारनिर्मिती, शेतीपूरक उद्योग, पर्यटन विकास, चांगल्या आरोग्य सुविधा, दर्जेदार शिक्षण आणि सक्षम दळणवळण व्यवस्था निर्माण करणे तितकेच गरजेचे असल्याचे मत व्यक्त होते. त्यानुषंगाने विविध कारणांनी होणारे स्थलांतरास किमान अटकाव निर्माण होऊ शकतो. शिक्षण व्यवस्थेच्या चिंतेस कारण ठरणारे सामाजिक वास्तव लक्षात घेऊन सर्वांगीण विकासाच्या उपाययोजनांच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT