खेड : खेड शहरातील डाग बंगला रोड परिसरात श्री. वैद्य यांच्या घराच्या मागील बाजूस १० जून रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वणव्याची आग लागली. आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
आगीच्या ज्वाळा जवळील बंगल्यांच्या दिशेने वेगाने पसरत होत्या. तसेच एका चारचाकी वाहनालाही आगीचा धोका निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवत बंगला आणि वाहन सुरक्षित ठेवण्यात यश आले. या मोहिमेत फायरमन श्याम देवळेकर, फायरमन दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव, सहायक फायरमन जयेश पवार आणि सुरज शिगवण यांनी धाडस व तत्परता दाखवत आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
अग्निशमन विभागाच्या वेळेवर झालेल्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावरील मालमत्तेचे नुकसान टळले असून परिसरातील नागरिकांनी अग्निशमन कर्मचार्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे.