Rohit Sharma 
रत्नागिरी

Rohit Sharma : इंग्लंडमध्ये रोहितला केलं 'क्लीन बोल्ड'; 'हिटमॅन'ने रत्नागिरीच्या पठ्ठ्याला दिला मराठीतनं कानमंत्र, म्हणाला...

भारतीय संघाच्या माजी कर्णधारासोबतच्या भेटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : क्रिकेटपटू म्हणून मोठे होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूसाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा प्रत्यक्ष भेटणे, त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळणे आणि त्याच्याकडून मराठीतून मार्गदर्शन मिळणे, हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. हा दुर्मीळ अनुभव रत्नागिरीच्या युवा अष्टपैलू क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याच्या वाट्याला आला असून इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत असताना त्याने रोहित शर्माला सलग पाच षटके गोलंदाजी केली. एवढेच नव्हे तर एका अप्रतिम चेंडूवर त्याने रोहितला त्रिफळाचीतही केले. त्यानंतर रोहितने मराठीतून दिलेला प्रेरणादायी सल्ला अविराजसाठी आयुष्यभराची शिदोरी ठरला आहे.

अविराज सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळत असून आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अनेक सामन्यांत ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी सरावासाठी रोहित शर्मा मिडलसेक्सच्या मैदानावर येणार असल्याचे समजताच अविराज व त्याचा मित्र त्याला भेटण्यासाठी तेथे पोहोचले. एनसीएचा टी-शर्ट परिधान केलेल्या अविराजकडे आयोजकांचे लक्ष गेले. त्याची चौकशी झाल्यानंतर तो लेगस्पिन गोलंदाज व अष्टपैलू क्रिकेटपटू असल्याचे समजताच त्याला थेट रोहित शर्माला सरावात गोलंदाजी करण्याची संधी देण्यात आली.

काही मिनिटांतच आपले क्रिकेट साहित्य घेऊन अविराज पुन्हा मैदानावर दाखल झाला. सुरुवातीला प्रचंड दडपणाखाली असलेल्या अविराजला रोहितनेच, "दडपण घेऊ नकोस... तुझा नैसर्गिक खेळ खेळ," असा आत्मविश्वास दिला. त्यानंतर अविराजने रोहितला सलग पाच षटके लेगस्पिन गोलंदाजी केली. एका अचूक चेंडूवर रोहित त्रिफळाचीत झाला. त्यावर हसतच रोहित म्हणाला, "आता कितीही चांगली गोलंदाजी केलीस तरी मी पुन्हा बाद होणार नाही." त्यानंतर उर्वरित सरावात तो बाद झाला नसला तरी सराव संपल्यानंतर त्याने अविराजच्या गोलंदाजीचे मनापासून कौतुक केले.

यानंतर दोघांमध्ये झालेला संवाद विशेष ठरला. सुरुवातीला इंग्रजीत सुरू झालेली चर्चा अविराज महाराष्ट्रातील असल्याचे समजताच थेट मराठीत सुरू झाली. "अरे वा... म्हणजे आपल्याकडचाच आहेस," असे म्हणत रोहितने आपुलकीने संवाद साधला. यावेळी त्याने युवा क्रिकेटपटूंना यशाचा महत्त्वाचा मंत्र दिला. "फक्त चांगली लाइन-लेंथ टाकून चालणार नाही. गोलंदाज असशील तर विकेटस्‌ घ्यायच्या, फलंदाज असशील तर भरपूर धावा करायच्या. भारतात लाखो क्रिकेटपटू आहेत. त्यांच्यापेक्षा वेगळे ठरायचे असेल तर कामगिरीच बोलली पाहिजे. मेहनतीला पर्याय नाही," असा मोलाचा सल्ला रोहितने दिला.

अविराजच्या मनगटातील नैसर्गिक कौशल्याचेही रोहितने कौतुक केले. "तुझ्याकडे टॅलेंट आहे. आता फक्त सातत्याने विकेट्स आणि धावा करण्यावर लक्ष केंद्रित कर. तू इंग्लंडमध्ये ४ महिने राहून मेहनत करण्याचा मोठा निर्णय घेतलास. सातत्य ठेव, मेहनत करत राहा," असे मार्गदर्शन त्याने केले. संवादाच्या शेवटी अविराजने आपल्या वडिलांशी फोनवर बोलण्याची विनंती केली असता रोहितने आनंदाने होकार दिला. मात्र दोनदा प्रयत्न करूनही वडील अनिल गावडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यावर रोहित हसतच, काही हरकत नाही... पुढच्या वेळी नक्की बोलू, असे म्हणाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT