Ratnagiri News 
रत्नागिरी

Ratnagiri News : निविदा प्रक्रिया होण्‍यापूर्वीच कुर्धेतील पुलाचे काम?

जि. प. अध्‍यक्ष व उपाध्‍यक्षांनी केली दुर्घटनाग्रस्‍त पुलाची पाहणी; पावसाळ्यात तात्‍पुरती व्‍यवस्‍था करणार

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : तालुक्‍यातील कुर्धे येथे बांधकाम सुरु असताना पूलाचा एक भाग कोसळून सुपरवायझरचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली असतानाच या छोट्या पुलाच्‍या कामाला मंजुरी नसल्‍याची माहिती पुढे येत आहे. दरम्‍यान, घटना घडल्‍यानंतर जि. प. अध्‍यक्ष व उपाध्‍यक्षांनी घटनास्‍थळी भेट देऊन पाहणी केली. पावसाळ्यात ग्रामस्‍थांची अडचण निर्माण होऊ नये यासाठी तात्‍पुरती पर्यायी व्‍यवस्‍था करून देण्‍याचे पदाधिकार्‍यांनी मान्‍य केले.

कुर्धे येथे लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्‍यान असणार्‍या छोट्या नदीवरील साकव नादुरुस्‍त झाल्‍याने या ठिकाणी वाहने जातील अशा पध्‍दतीने छोट्या पुलाची मागणी ग्रामस्‍थांनी केली होती. त्‍यानुसार साकव विकास कार्यक्रमांतर्गत पुलाचे काम करण्‍याचेही ठरवण्‍यात आले होते. यासाठी सुमारे 55 लाखांचा प्रस्‍तावही तयार करण्‍यात आला होता. परंतु या कामाची निविदा प्रक्रिया झाली नव्‍हती, अशी माहिती आता चर्चिली जात आहे.

या पुलावर काँक्रीटचे काम बाकी होते. मात्र मंगळवारी पुलाच्‍या क्रॉक्रीटचा भाग कोसळून सुपरवायझर अक्षय काटे याचा मृत्‍यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा अस्‍मिता केंद्रे आणि उपाध्‍यक्ष विलास चाळके यांच्‍यासह स्‍थानिक लोकप्रतिनिधी यांनी घटनास्‍थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्‍यांनी परिसरातील ग्रामस्‍थांशी चर्चा केली. हा ब्रीज अर्धवट राहणार असल्‍यामुळे ग्रामस्‍थांचे पावसाळ्यात वाहतुकीचे हाल होणार आहेत. विद्यार्‍थ्यांनाही याचा फटका बसणार आहे. त्‍यामुळे पावसाळ्यात येण्‍याजाण्‍यापूरती तात्‍पुरती सुरक्षित व्‍यवस्‍था करुन देण्‍याच्‍या सूचना जि.प. बांधकाम विभागाला देण्‍यात आल्‍या आहेत. दरम्‍यान, या घटनेची चौकशीही प्रशासनामार्फत केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT