राजापूर : राजापूर शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गढूळ पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाच्या निराकरणासाठी जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्ती व आधुनिकीकरणासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार किरण सामंत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाल्याची माहिती नगरसेवक महेश शिवलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील गढूळ पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून १६ मे रोजी निवेदनाद्वारे आमदार किरण सामंत यांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून राजापूर नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्ती व संबंधित पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आल्याचे महेश शिवलकर यांनी सांगितले.
राजापूर नगर परिषदेचे मुख्य जलशुद्धीकरण केंद्र अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आले असून कालांतराने येथील यंत्रसामग्री व अंतर्गत सुविधा जीर्ण झाल्या आहेत. मुख्य पंप, फिल्टर तसेच रासायनिक प्रक्रियेतील उपकरणे वारंवार बिघडत असल्याने शुद्ध पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. तांत्रिक अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्ती व आधुनिकीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. या कामांमुळे शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम व सुरक्षित होण्यास मदत होईल, असा विश्वास शिवलकर यांनी व्यक्त केला.
यापूर्वीही आमदार किरण सामंत यांनी नगरसेवक शिवलकर यांनी सूचविलेल्या विविध विकासकामांना मंजुरी देत निधी उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये भटाळी रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, रिटेनिंग वॉल, महावितरणच्या रस्त्यातील पोलचे स्थलांतर तसेच मुख्य रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक आदी कामांचा समावेश आहे. काही कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे पावसाळ्यानंतर पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
याशिवाय शहरातील वैकुंठभूमीच्या विकासासाठी, अंतर्गत रस्ते तसेच ड्रेनेज व्यवस्थेसाठीही निधी मिळणार असल्याचे आमदार सामंत यांनी आश्वासन दिले आहे. राजापूर शहरातील जवाहर चौक येथे पोलिस चौकी उभारण्याची मागणीही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे शिवलकर यांनी सांगितले.