House Burglary Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri News : खंडाळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन बंद घरे फोडली!

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

गणपतीपुळे : खंडाळा परिसरात चोरट्यांनी डोके वर काढत एकाच रात्री तीन बंद घरांना लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच देवरुखमध्येही सलग तीन घरे फोडल्याच्या घटना ताज्या असतानाच आता रत्नागिरीतही घरफोड्यांची मालिका सुरू झाल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, रात्रीच्या वेळी बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याची चर्चा आहे.

वाटद खंडाळा येथील रहिवासी राकेश शशिकांत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री १० ते सोमवारी सकाळी ६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजावरील कुलूप धारदार हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर गोदरेज कपाटातील १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे (किंमत १३ हजार रुपये) चोरून नेले.

तसेच आदर्शनगर येथील शुभम श्रीकांत महाडिक हे मुंबईला गेल्याने त्‍यांचे बंद असलेले घर, तसेच श्रीराम नगर येथील मंदार श्रीकांत बारगुडे यांच्या बिअर शॉपीचे गोडाऊन व परेश चंद्रकांत गुरव यांचे बंद घरही चोरट्यांनी फोडल्याचे उघड झाले. त्यामुळे एकाच परिसरात सलग तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या घटनांची नोंद जयगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास जयगडचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा व जयगड पोलिस करत आहेत.

देवरुखनंतर आता रत्नागिरी शहरातही चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. घरफोड्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे आणि पोलिसांनी तातडीने प्रभावी उपाययोजना करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT