कनकाडी ग्रा.पं.ची ठेकेदाराकडून ४९ हजारांची वसुली Pudhari File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : कनकाडी ग्रा.पं.ची ठेकेदाराकडून ४९ हजारांची वसुली

तळी बांधकामातील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलनाला यश; जादा अदा केलेली रक्कम परत जमा

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी येथील गोताडवाडीमधील तळी बांधकामाच्या कथित अनियमिततेप्रकरणी झालेल्या फेरमूल्यांकनानंतर कंत्राटदाराकडून ४९ हजार ६७४ रुपये ग्रामपंचायतीने वसूल केले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विकास बारकू गुरव यांनी केलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने फेरमूल्यांकनाचे आदेश दिले होते. त्यानंतर जादा अदा झालेली रक्कम परत जमा झाल्याने या प्रकरणाची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.

कनकाडी गोताडवाडी येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तळी बांधण्याचे काम करण्यात आले होते. या कामाचे प्रारंभीचे मूल्यांकन २ लाख २५ हजार रुपये करण्यात आले होते. त्यानुसार संबंधित कंत्राटदार नितीन नारायण गुरव यांना कामाची रक्कम अदा करण्यात आली होती. मात्र, कामाच्या दर्जाबाबत तसेच मूल्यांकन प्रक्रियेबाबत विकास बारकू गुरव यांनी आक्षेप घेत आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने कामाचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश दिले. उपविभागीय कार्यालय, संगमेश्वर यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या फेरमूल्यांकनात या कामाची प्रत्यक्ष किंमत १ लाख ६५ हजार २१७ रुपये इतकीच असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कंत्राटदाराला देण्यात आलेल्या रकमेपैकी ४९ हजार ६७४ रुपये जादा अदा झाल्याचे स्पष्ट झाले.

फेरमूल्यांकनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्मल ग्रामपंचायत कनकाडी यांनी संबंधित कंत्राटदाराला सात दिवसांत जादा घेतलेली रक्कम परत भरण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार कंत्राटदाराने ४९ हजार ६७४ रुपये ग्रामपंचायतीच्या स्वनिधी खात्यात जमा केले. ग्रामपंचायतीने १० जुलै २०२६ रोजी या रकमेची अधिकृत पावतीही दिली आहे.

या प्रकरणामुळे ग्रामपंचायत स्तरावरील विकासकामांच्या गुणवत्तेबाबत आणि आर्थिक व्यवहारांबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. फेरमूल्यांकनाच्या माध्यमातून जादा अदा झालेला शासकीय निधी परत मिळाल्याने तसेच भष्ट्राचाराला वाचा फुटल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT