रत्नागिरी : खेड तालुक्यातील दहिवली येथील भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील २७ अतिसंवेदनशील दरडप्रवण क्षेत्रांतील नागरिकांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये मानवी जीव सर्वात महत्त्वाचा असून धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
मंगळवारी जिल्ह्यातील पूरस्थिती व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दहिवली येथील भूस्खलनातील मृतांच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देण्यात आले असून पावसामुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांनाही शिवसेनेतर्फे मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दहिवलीतील दुर्घटनेपूर्वी प्रशासनाने नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र काहींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व २७ दरडप्रवण क्षेत्रांतील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याची तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध करून दिलेले साहित्य अनेक ठिकाणी जागेवर नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आल्याचे सांगत प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या.
खेड व चिपळूण दौऱ्यात व्यापाऱ्यांशी संवाद साधताना नदीपात्रातील गाळ काढल्यामुळे यंदा बाजारपेठेत पाणी भरण्याचे प्रमाण कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच कशेडी घाटात दरड कोसळलेली नसून संपूर्ण डोंगरच घसरूल्याचे दिसून आल्याने या घटनेचा भूगर्भशास्त्रज्ञांकडून सखोल अभ्यास केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.