भारतीय मच्छीमार file photo
रत्नागिरी

Fishing News : मच्छीमारांना सॅटेलाईट फोन देणार

शासनाचा बीएसएनएलसोबत समन्वय; आपत्कालीन संपर्क व सुरक्षेसाठी आधुनिक सुविधा

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना किनाऱ्याशी अखंड संपर्क ठेवता यावा, आपत्कालीन प्रसंगी तातडीने मदत मिळावी आणि हवामानासह सुरक्षेच्या सूचना वेळेवर मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने मच्छीमारांना सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, राज्यातील मच्छीमारांचे प्राण आणि उपजीविका सुरक्षित ठेवणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. खोल समुद्रात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत सॅटेलाईट फोन ही मच्छीमारांसाठी जीवनदायी संपर्क व्यवस्था ठरेल. बीएसएनएलच्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक असून, त्यामुळे समुद्रातील सुरक्षा, बचावकार्य आणि संप्रेषण अधिक प्रभावी होईल.

बैठकीत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी ग्लोबल सॅटेलाईट फोन सेवेचे सादरीकरण करताना या तंत्रज्ञानाची कार्यपद्धती, कव्हरेज, उपकरणांची वैशिष्ट्ये आणि खोल समुद्रात संपर्क राखण्यासाठी त्याची उपयुक्तता याविषयी माहिती दिली. सॅटेलाईट फोनच्या माध्यमातून मोबाईल नेटवर्क नसलेल्या समुद्रातील खोल भागातही सातत्यपूर्ण संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे खराब हवामान, यांत्रिक बिघाड, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा अन्य संकटाच्या वेळी तात्काळ मदत मागवणे शक्य होईल. तसेच मत्स्य नौकांचा किनाऱ्याशी संपर्क कायम राहिल्याने बचाव यंत्रणेला जलद प्रतिसाद देणे सुलभ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT