रत्नागिरी

Ratnagiri Rain : जिल्हा चिंब; पण नद्यांची पातळी घटलेलीच

बळीराजाला दिलासा, २४ तासांत २५५ मिमी पाऊस; वेरळ येथे दरड कोसळून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाने दमदार हजेरी लावत गुरुवारी संततधार आणि मुसळधार सरींचा जोर कायम ठेवला. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तब्बल २५५.४९ मिमी पावसाची नोंद झाली असून रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यांत सर्वाधिक पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यातील वेरळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर मातीचा ढिगारा कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली, तर शहरांसह ग्रामीण भागातील अनेक सखल भाग जलमय झाले. दुसरीकडे, पावसाच्या पुनरागमनामुळे भात आणि नाचणी पेरणीला वेग येणार असल्याने बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

जूनच्या पहिल्या पंधरवड्यानंतर तब्बल वीस दिवस मान्सूनने दडी मारल्याने शेतकरी आणि नागरिक चिंतेत होते. मात्र रविवारपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी सलग चौथ्या दिवशी जोरदार बरसत जिल्ह्याला दिलासा दिला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. माळनाका परिसरासह शहरातील अनेक भागांत वाहनधारक आणि पादचाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागला.

पावसामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून रस्त्यांच्या कडेला खचण्याच्या घटना घडत आहेत. वेरळ येथील दरडीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक प्रभावित झाली. सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे.

विशेष म्हणजे, चार दिवसांच्या पावसानंतरही जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही. शास्त्री, सोनवी, कोदवली आणि मुचकुंदी नद्यांची पाणीपातळी अद्याप अत्यल्पच आहे, तर जिल्ह्यात अजूनही १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी २९ जूनपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस मध्यम ते जोरदार पाऊस, मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT