रत्नागिरी

गाखवडी समुद्रात आत्तापर्यंत झेपावली ८९७ कासवांची पिल्ले!

Gaonkhadi turtle festival | गेल्या तीन महिन्यांत ७८ घरटी संरक्षित ; ८४०६ अंडी केली होती कासव संवर्धन केंद्रात संरक्षित

पुढारी वृत्तसेवा

पावस : ऑलिव्ह रिडले या कासवाच्या जातीला अंडी घालण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील गाखवडी समुद्रकिनारा सुरक्षित वातावरणामध्ये मिळत असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या समुद्रकिनाऱ्यावर गेल्या तीन महिन्यांच्या कालखंडामध्ये ७८ घरटी संरक्षित करण्यात आली असून त्या माध्यमातून ८४०६ अंडी कासव संवर्धन केंद्रामध्ये ठेवण्यात आली. त्यातील आत्तापर्यंत ८९७ कासवांची पिल्ले समुद्र किनारी झेपावली आहेत.

ऑलिव्ह रिडले कासवाची जात संपुष्टात येत असताना गाखवडी किनाऱ्यावर अंडी संरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गाखवडी समुद्रकिनाऱ्यावर अनेक वर्ष ऑलिव्ह रिडले या कासवाच्या जातीने अंडी घालण्यास सुरुवात झाली. हा समुद्रकिनारा अंडी घालण्यास पोषक असल्यामुळे दरवर्षी या किनाऱ्यावर ही कासवे मोठ्या प्रमाणात अंडी घालण्यास येतात. कासव मित्र व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कासव संवर्धन केंद्र निर्माण केले असून त्या माध्यमातून समुद्रकिनारी आढळणारी कासवांची घरटी योग्यठिकाणी संरक्षित केली जातात; जेणेकरून त्या भागामध्ये अन्य कोणत्याही गोष्टीचा वाईट परिणाम न होता योग्यतेने संरक्षित होऊन त्या अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांना पुन्हा समुद्रामध्ये व्यवस्थितरित्या सोडण्याच्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

साधारण जानेवारी ते मे यादरम्यान अंडी घालण्याचा हंगाम सुरू होतो. यावर्षी ८ जानेवारीला पहिले घरटे तयार झाले. त्यानंतर ३० मार्चपर्यंत ७८ घरटी तयार झाली असून त्यात सापडलेल्या आठ हजार चारशे सहा अंड्यांचे कासव संवर्धन केंद्रामध्ये संवर्धन करण्यात आले. त्यांच्या वाढीचा ४५ ते ५० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात होते. अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असते. त्यामुळे ३० मार्चअखेर या संरक्षित करण्यात आलेल्या घरट्यांमधून आत्तापर्यंत ८९७ तयार झालेल्या कासवांच्या पिल्लांना सुरक्षितपणे गाखवडी समुद्रात सोडण्यात आले. अंडी घालणाऱ्या कासवांना पोषक व सुरक्षित वातावरण या समुद्रकिनाऱ्यावर मिळत असल्यामुळे अजूनही घरटी मिळण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्यामुळे सायंकाळच्यावेळी अनेक पर्यटक या कासव संवर्धन केंद्राला आवर्जून भेट देऊन कासवाची पिल्ले समुद्राच्या दिशेने झेपावतानाही आवर्जून उपस्थित असतात.

दक्षिण कोकण कांदळवन विभागीय वनाधिकारी कांचन पवार, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका पाटील, रत्नागिरी कांदळवन विभाग वनक्षेत्रपाल किरण ठाकूर, वनपरिमंडळ अधिकारी मिलिंद डफळे, गाखवडी वनरक्षक अमोल बिराडे तसेच कासव मित्र प्रदीप डिंगणकर, विकास आंबेरकर, विनोद सुर्वे हे सर्वजण टीमवर्क म्हणून गाखवडी येथील केंद्राला चांगली गती प्राप्त करून देण्याचे काम करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT