दापोली : तालुक्यातील बेकरी, हॉटेल, चायनीज सेंटर, भेळपुरी आणि आईस्क्रीम दुकाने याठिकाणी असलेली अस्वच्छता व भेसळयुक्ततेलामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दापोलीसारख्या पर्यटनप्रधान ठिकाणी अशा प्रकारांवर तातडीने कारवाई होणे आवश्यक असताना अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाया मात्र गेल्या काही महिन्यांपासून थंडावल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
एखादी तक्रार प्राप्त झाली की, तात्पुरती कारवाई दाखवून फाईल बंद केली जाते, असा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.अलीकडेच गुहागर तालुक्यातील शृंगरतळी येथे बेकरीतील पेढे खाऊन विषबाधा झाल्याची घटना ताजी आहे. ही घटना जिल्हा प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरावी, अशी अपेक्षा होती. असे असताना दापोलीत मात्र अन्न औषध विभागाकडून तपासणी मोहीम राबवली जाताना दिसत नाही. दिवाळी सण असल्याने शहरात विविध गोडधोड पदार्थ, सुकामेवा, किराणा माल, तेल, तूप, बेसन व साखर यांच्या विक्रीला मोठी चालना मिळाली आहे. विक्री वाढल्याने काही व्यावसायिकांनी दर्जा आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याचे ग्राहकांच म्हणणे आहेत.
शहरात आणि ग्रामीण भागात बेकरी, स्वीट मार्ट, पाणीपुरी व टपरी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. मात्र अनेकांकडे आवश्यक परवाने नाहीत, तसेच स्वच्छतेचे नियम पाळले जात नाहीत. काहीठिकाणी अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या साहित्याचा दर्जाही संशयास्पद आहे. अन्न व औषध प्रशासनाने दापोलीतील सर्व बेकरी, स्वीट मार्ट, हॉटेल व उघड्यावर चालणार्या खाद्यव्यवसायिकांची धडक तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच या व्यावसायिकांसह त्यांच्या कर्मचार्यांची आरोग्य तपासणी करूनच परवानगी द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. अन्न सुरक्षा ही केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात अंमलात यावी. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्तकेली जात आहे.