रत्‍नागिरी : शहरातील निवखोल येथे रस्‍त्‍यावर आलेली दरड 
रत्नागिरी

Ratnagiri Rain : पहिल्‍याच पावसात रत्‍नागिरी शहराला फटका

मधला फगरवठार येथे संरक्षक भिंत कोसळली, अनेक ठिकाणी पाणी भरले, झाडे उन्मळून पडली

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : गेले चोवीस तास पडणाऱ्या पावसामुळे रत्‍नागिरी शहरातील काही भागाला चांगलाचा तडाखा दिला. शहरातील मधला फगरवठार येथे बांधकाम व्‍यावसायिकाने डोंगराळ भागात खोदाई केल्‍यामुळे संरक्षक भिंत कोसळल्‍याची घटना घडली. यामुळे येथील रस्‍ता धोकादायक बनला असून काही घरांनाही धोका निर्माण झाला आहे. झाडे कोसळण्‍याबरोबरच अर्धवट कामांचा फटका बसून पाणी रस्‍त्‍यावर भरण्‍याचे प्रकाराने नागरिकांची तारांबळ उडाली.

मागील दोन दिवसांपासून रत्‍नागिरीत मान्‍सून सक्रिय झाला आहे. मागील चोवीस तासात पावसाने चांगली हजेरी लावली. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. शहरातील मधला फगरवठार येथून वरचा फगरवठारच्‍या दिशेने जाणाऱ्या रस्‍त्‍यालगत असणारी संरक्षक भिंत कोसळली. ही घटना सकाळी सात वाजण्‍याच्‍या सुमारास झाली. जवळपास सत्तर ते ८० फूट लांब संरक्षक भिंत खाली गेली. या भिंतीच्‍या खालील बाजूने एका बांधकाम व्‍यावसायिकाने घर बांधण्‍यासाठी जमीन सपाट करण्‍याचे काम ऐन पावसाच्‍या तोंडावर सुरू केले होते. संरक्षक भिंतीच्‍या खालील बाजूची माती मोठ्याप्रमाणात काढली गेल्‍यामुळे ही भिंत ढासळली. यावेळी मोठा आवाज झाला. भिंतजवळ असलेले आंब्‍याचे झाडही खाली पडले. त्‍यामुळे विजेच्‍या ताराही तुटून पडल्‍या. मधला व वरचा फगरवठार येथील वीज पुरवठा खंडीत झाला. ही संरक्षक भिंत कोसळल्‍यामुळे वरच्‍या फगरवठारच्‍या दिशेने जाणारा रस्‍ता धोकादायक बनला असून, सध्‍या नगर पालिकेने हा रस्‍ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. या संरक्षक भिंतीच्‍या खालील बाजूला असणाऱ्या खालचा फगरवठार परिसरातील घरांनाही यामुळे धोका निर्माण झाला आहे. नगर परिषद संबंधितांवर कोणती कारवाई करते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

महावितरण व नगर पालिकेला याची माहिती मिळाल्‍यानंतर महावितरणच्‍या कर्मचाऱ्यांनी सुमारे चार ते पाच तास काम करती वीज पुरवठा सुरळीत केला तर नगर पालिकेचे कर्मचाऱ्यांनी आंब्‍याचे झाड तोडून रस्‍ता मोकळा करीत, धोकादायक भाग वाहतुकीला बंद केला. जवळपास सात वाजल्‍यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत कर्मचारी काम करीत होते. प्रभाग १ चे नगरसेवक व पाणी सभापती निमेश नायर यांना स्‍थानिक नागरिकांनी घटनेची माहिती दिल्‍यानंतर ते सकाळी ७ वाजल्‍यापासून दुपारी १.३० वाजेपर्यंत घटनास्‍थळी ठाण मांडून होते. याठिकाणी नगर परिषद कर्मचारी, महावितरण कर्मचाऱ्यांना त्‍यांनी सूचना दिल्‍या. नायर यांच्‍या भूमिकेबद्दल स्‍थानिकांनी समाधान व्‍यक्त केले.

मिऱ्या-नागपूर हायवेचे काम परवटवणे परिसरात सुरु असून पावसाच्‍या पाण्‍याबरोबर मोठ्याप्रमाणात चिखल खालचा फगरवठार परिसरात घुसला. यामुळे या भागात चिखलमय परिस्‍थिती निर्माण झाली होती. स्‍थानिक नगरसेवकांनी नागरिकांचे फोनच न उचलल्‍याने अनेकांनी प्रशासनाशी संपर्क साधला. या घटनेबद्दल तीव्र नाराजी नागरिकांमधून व्‍यक्त होत आहे.

शहरातील कर्ला-आंबेशेतकडे जाणाऱ्या जीजीपीएस हायस्‍कूलच्‍या मागील रस्‍त्‍यावर दरड कोसळल्‍याचा प्रकार पहाटे घडला. मात्र रस्‍त्‍यावरुन वाहतूक एका बाजून सुरू होती. निवखोल येथे वडाचे मोठे झाड उन्मळून पडले. भाटकरवाडा येथे वीज वाहिनीवर झाड कोसळले, थीबा पॅलेस येथील हाँटेल जवळचे वडाचे झाड उन्मळून पडले, तांबट आळी येथे वीजवाहिनीवर झाडाच्या फाद्या कोसळल्या, माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयालगतच्या वीज वाहिनीवर झाडांच्या फाद्या कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला. शहरातील झाडगाव येथे आंब्‍याचे मोठे झाड रस्‍त्‍यावर आडवे झाल्‍याने रस्‍ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्‍यात आला होता. दोन-तीन तासाच्‍या प्रयत्‍नानंतर ही वाहतूक सुरळीत झाली.

शहरातील मारुती मंदिर, स्‍टेडियमच्‍या मागील भाजीमार्केटजवळ यावर्षीही गटारे स्‍वच्‍छ न केल्‍यामुळे पाणीचपाणी झाले होते. गटार आणि रस्‍ताही दिसून येत नव्‍हता. शहरातील रामआळीमध्‍येही पहाटेच्‍यावेळी पाणीच पाणी साचले होते. पाऊस कमी झाल्‍यानंतर येथील पाणी ओसरले. शहरातील चवंडेवठार येथे गटारांची साफसफारी योग्‍य प्रकारे न झाल्‍यामुळे घरांसमोर पाणी साचल्‍याने नागरिकांमध्‍ये तीव्र नाराजी व्‍यक्त करण्‍यात येत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT