रत्नागिरी : रत्नागिरीसह राज्यात नगरपरिषद, नगरपंचायत,नगरपालिका निवडणुकीचे बिगूल वाजले असून मोठ्या पक्षापासून ते घटकपक्षांकडून शक्तिप्रदर्शन करून आपापले उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. ऐन थंडीच्या वातावरणात निवडणुकीची गरमी वाढू लागली आहे. ज्यांनी उमेदवादी अर्ज दाखल केले आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता सोशल मीडियावर जोरात प्रचार करीत आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा हे प्रचाराचे माध्यम बनले आहे. भावी नगराध्यक्ष, नगरसेवकांचे कार्यकर्ते आपल्या नेत्याचा मोठा प्रचार करीत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट, भाजप पक्षाने सोशल मीडियावर प्रचाराची आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसह विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत सोशल मीडिया प्रचाराचे माध्यम ठरत आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसह इतर घटक पक्ष सोशल मीडियाचा आधार घेत असतात. सध्याच्या निवडणुकीत सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामुळेच नेतेही सोशल मीडियाचा वापर आपल्या प्रचारासाठी तसेच कामांच्या प्रसिद्धीसाठी करताना दिसत आहे. यासाठी मोठ्या नेत्यांची सोशल मीडिया सांभाळणारी विशेष टिमच असते. शिवाय आता सोशल मीडिया सांभाळण्याचा एक व्यवसाय बनला असून कित्येक तरूण यात व्यस्त आहेत.
नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारही सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करीत आहेत. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हा फंडा आता राजकारणी वापर करीत आहेत. ज्याचे तिकीट कन्फॉर्म झाले तर त्या उमेदवाराचे फोटो पक्षाच्या चिन्हासोबत कार्यकर्ते आपआपल्या व्हॉटससॲप स्टेटवर ठेवत आहेत. तसेच फेसबुक, इन्स्टाग्रॅमवर स्टोरी, फोटोज, व्हिडीओज ठेवण्यात येत आहे. आपल्या उमेदवारास निवडून द्या, कोकणाचा विकास करू, यासह विविध आशयाचे स्टेटस ठेवण्यात येत आहे. कार्यकर्ते घरच्यांचा कमी, तर आपल्या लाडक्या उमेदवाराचा फोटो ठेवून प्रचार करीत आहेत. त्यामुळे सध्या व्हाटस्ॲप स्टेटसचा व अन्य माध्यमाचा वापर करून जोरदार प्रचार सुरू आहे.