रत्नागिरी : रत्नागिरीकरांच्या आरोग्याची काळजी वाहणारे जिल्हा रुग्णालय स्वतःच सध्या आयसीयूमध्ये असल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयातील तब्बल ८० टक्के वैद्यकीय पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना सेवा देताना डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची प्रचंड दमछाक होत आहे. याच गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला सदिच्छा भेट देऊन येथील आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. या भेटी दरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांनी समस्यांचा पाढाच आमदार जठार यांच्यासमोर वाचला.
जिल्हा रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर जयप्रसाद रामानंद यांनी आमदार जठार यांना रुग्णालयातील सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली. रुग्णालयात ८० टक्के डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. त्यातच आता रुग्णालयातील नर्सेसची संख्याही कमी केली जात असल्याने आरोग्य सेवा कोलमडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
नर्सेसची नियुक्ती करताना त्यांना सीईटी परीक्षा अनिवार्य करू नये, तर जीएनएम केलेल्या स्थानिक विद्यार्थ्यांना भरतीत प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. रुग्णालयातील बिकट अवस्था दूर करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने विशेष स्टाफची तातडीने भरती करावी, एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करावी, तसेच अत्यंत महत्त्वाचे असलेल्या भूलतज्ज्ञ आणि गायनॅकॉलॉजिस्ट (स्त्रीरोगतज्ज्ञ) यांची तत्काळ नेमणूक करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे साकडे डॉक्टरांनी आमदार जठार यांना घातले.
जिल्हा रुग्णालयातील या गंभीर समस्या ऐकून घेतल्यानंतर आमदार प्रमोद जठार यांनी चिंता व्यक्त केली आणि रत्नागिरीकरांना उत्तम आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे सांगितले. ही संपूर्ण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आपण स्वतः वैद्यकीय शिक्षण व आरोग्य मंत्र्यांची भेट घेणार असून, जिल्हा रुग्णालयातील हे सर्व प्रलंबित प्रश्न आणि रिक्त पदांचा मुद्दा तातडीने मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करू, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. या आढावा बैठकीच्या प्रसंगी आमदार प्रमोद जठार, डॉ. जयप्रसाद रामानंद यांच्यासह भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाटलेकर आदी उपस्थित होते.