रत्नागिरी : वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व नीट प्रवेश परीक्षा रविवारी शहरातील दोन केंद्रांवर शांततेत पार पडली. जिल्ह्यातील १ हजार ३९ पैकी ८८८ विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली, तर १५१ विद्यार्थी गैरहजर राहिले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
नीटची परीक्षा यापूर्वी ३ मे रोजी झाली होती. पेपर फुटीमुळे रद्द झालेली ही परीक्षा पुन्हा रविवारी घेण्यात आली. दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ यादरम्यान शहरातील गोगटे जोगळेकर व फाटक हायस्कूल या दोन केंद्रांवर ही परीक्षा झाली. विद्यार्थ्यांना १५ मिनिटे अधिकची वेळ देण्यात आली होती. मागच्या वेळी परीक्षेचा कालावधी तीन तासांचा होता.
नीटची पुन्हा एकदा परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर टेंशन होते. सकाळपासूनच दोन्ही केंद्रांच्या बाहेर पालकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. दोन्ही केंद्रांवर पोलिस, सीआरपीएफचे जवान तैनात होते. अखेर शांततेत व चोख बंदोबस्तात परीक्षा झाली.