देवरुख : आरवली गरम पाणी कुंडाजवळ उलटलेला ट्रक 
रत्नागिरी

Ratnagiri Truck Accident : आरवलीत उलटला ट्रक; मद्यधुंद चालकाचा थरकाप उडवणारा प्रताप

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली येथील प्रसिद्ध गरम पाण्याच्या कुंडाजवळ मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र अपघातानंतर घटनास्थळी चांगलाच गोंधळ उडाला होता.

प्राथमिक माहितीनुसार, हा ट्रक मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना अचानक विरुद्ध लेनमध्ये घुसला आणि काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला कलंडला. हा अपघात इतका भीषण होता की, तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय येत, या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.

अपघात घडताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. ट्रक चालकाला बाहेर काढले असता, तो पूर्णपणे मद्यधुंद (दारूच्या नशेत) अवस्थेत धुंद होता, असा खळबळजनक आरोप प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी केला आहे. चालकाच्या या बेजबाबदारपणामुळे मोठा अनर्थ ओढवू शकला असता, अशी भीतीही स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, या अपघाताबाबत अद्याप स्थानिक पोलिस ठाण्यात अधिकृतपणे कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची किंवा अपघाताची नोंद झालेली नाही. मात्र, महामार्गावरील अशा बेदरकार चालकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT