रत्नागिरी : इन्स्टाग्रामवर मैत्री करून एका डॉक्टरला नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २५ हजार रुपये उकळल्याचा प्रकार राजापूर तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका संशयिताविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय गिरीधर म्हाडये (वय ३१, रा. वडनहसोळ म्हाडयेवाडी, ता. राजापूर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. सिद्धेश जयवंत आंबरे (वय ३०, रा. साडवली, ता. लांजा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डॉक्टर असून २०२५ मध्ये इन्स्टाग्रामवरील ‘नेहा भंडारी-०३’ या आयडीवरून त्यांची ओळख झाली होती. संबंधित महिलेच्या सांगण्यावरून फिर्यादींनी स्वतःचे नग्न फोटो शेअर केले होते. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत संशयिताने फिर्यादींकडे पैशांची मागणी सुरू केली. संशयिताकडे असलेले फोटो व्हॉट्सॲपवर पाठवून ‘पैसे दिले नाहीत तर फोटो इतरत्र शेअर करू’ अशी धमकी दिली होती. या भीतीपोटी फिर्यादींनी गुगल पेद्वारे संशयिताला २५ हजार रुपये पाठवले. मात्र, त्यानंतरही धमक्या सुरूच राहिल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी राजापूर पोलिस अधिक तपास करत आहेत.