देवरुखमध्ये नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवा बंद 
रत्नागिरी

Ratnagiri News : देवरुखमध्ये नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवा बंद

ठेकेदाराचा बेजबाबदारपणा नडला; महिला, ज्येष्ठ नागरिकांना नाहक होतोय मनस्ताप

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : राज्य परिवहन मंडळाच्या विविध सवलतींचा लाभ घ्यायचा असेल तर १ ऑगस्टपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्याची घोषणा राज्य परिवहन मंडळ आणि परिवहन मंत्र्यांनी केली आहे. मात्र देवरुख बसस्थानकात कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित ठेकेदाराने कार्डची नोंदणी बंद केल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना देवरुख बसस्थानकातून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. यात आर्थिक भुर्दंडासह नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी याची गंभीरपणे दखल घ्यावी अशी मागणी लोवले-संगमेश्वर येथील ज्येष्ठ नागरिक कमलाकर लोवलेकर (वय ८०) यांनी केली आहे.

गत आठवड्यात परिवहन मंत्र्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासातील विविध सवलतींचा लाभ घयायचा असल्यास प्रवाशांकडे एनसीएमसी कार्ड बंधनकारक केलं. यासाठी १ ऑगस्ट ही तारीखदेखील राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे.

संगमेश्वर तालुक्यात एनसीएमसी कार्ड काढण्याची सोय देवरुख बसस्थानकात असून हे कार्ड तयार करुन देण्याचे कंत्राट खासगी कंपनीकडे आहे. देवरुख येथे ज्या ठेकेदाराकडे हे काम सोपवण्यात आले आहे, त्याने अचानक मंगळवारपासून कोणतीही पूर्वसूचना न देता काम बंद केले. कमलाकर लोवलेकर हे सकाळी ८ वा. खास रिक्षा करुन देवरुख बसस्थानकात एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी पोहचले. देवरुख बसस्थानकात ८.३० वा. पोहचल्यानंतर त्यांना सदर ऑफिस ९.१५ वाजता उघडेल असे आरक्षण कक्षातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं. सकाळचे दहा वाजले तरी एनसीएमसी कार्डचे कार्यालय न उघडल्यामुळे लोवलेकर यांनी परत आरक्षण कक्षात चौकशी केली. यावेळी त्यांना सदर कार्ड काढण्याचा ठेका एका खासगी कंपनीकडे असल्याचे सांगून तेथे काम करणाऱ्या एका कामगार महिलेचा मोबाईल नंबर दिला. सकाळी १०.३० पर्यंत अनेक ज्येष्ठ नागरीक व महिला कार्ड काढण्यासाठी व काही पूर्वी काढलेली कार्डे नेण्यासाठी दोन तास बसस्थानकात ताटकळत उभे होते.

अखेरीस सर्वांनाच होत असलेला मनस्ताप लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक लोवलेकर यांनी एनसीएमसी कार्ड काढून देणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला फोन लावला. यावेळी तिने तांत्रिक अडचणीमुळे कार्यालय बंद असल्याचे सकाळी १०.३० वा. सांगितले. याबाबत आपण कार्यालयात उपस्थित राहून उपस्थित ज्येष्ठ नागरिक व महिलांना सांगणं आवश्यक असल्याचे सांगताच त्या कर्मचारी महिलेने उत्तर देणं टाळलं. यानंतर लोवलेकर हे या बेजबाबदार कारभाराबाबत देवरुख आगारप्रमुखांना ज्येष्ठ नागरिक व महिलांची व्यथा सांगण्यासाठी गेले असता आगारप्रमुख भेटू शकल्या नाहीत. अखेरीस लोवलेकर यांनी आगारातील अन्य अधिकारी कोळी यांची भेट घेतली. त्यावेळी कोळी यांनी लोवलेकर यांचे म्हणणे ऐकून घेतले व कार्ड काढणाऱ्या संबंधित ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीना फोन केला असता, आम्हाला मिळणारे कमिशन तुटपुंजे असल्यामुळे आजपासून कार्ड काढण्याचे बंद केल्याचे सांगितले. याबाबत कोळी यांनी आपण तसे महामंडळाला कळवलं आहे का? कार्ड काढण्याच्या ठिकाणी फलक लावला आहे का? असे प्रश्न विचारले असता उत्तर देण्याचे टाळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT