देवरुख : कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? असाच एक संतापजनक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील शिवने गावातून समोर आला आहे. शिवने गावचे पोलिस पाटील मनोज शिंदे यांनी एका गरीब कुटुंबाच्या हक्काच्या घराचे कुलूप बेकायदेशीरपणे तोडून त्यावर ताबा मिळवला आणि ते घर दुसऱ्याच एका दांपत्याला भाड्याने दिल्याची तक्रार दाखल झाली आहे.
याप्रकरणी पीडित महिला स्मिता श्रीराम जुवेकर (रा. देवरुख) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांकडे लेखी तक्रार केली असून न्यायाची मागणी केली आहे. तक्रारदार जुवेकर या देवरुख येथे आपल्या पती आणि मुलासह भाड्याच्या घरात राहून मजुरी करून उदरनिर्वाह चालवतात. मौजे शिवने (ता. संगमेश्वर) येथील ग्रामपंचायत हद्दीतील घर क्र. ४३६ हे त्यांचे हक्काचे वारसा हक्काने मिळालेले घर आहे. हे घर इंदिरा आवास घरकुल योजने अंतर्गत बांधलेले आहे. जुवेकर कुटुंब सुट्टीच्या दिवशी किंवा सणासुदीला या घरात ये-जा करत असत. या घराची घरपट्टी आणि वीजबिलही त्यांच्याच नावे असून त्या ते नियमित भरतात.
तक्रारीनुसार, मंगळवारी २६ मे रोजी पोलिस पाटील मनोज शिंदे यांनी दांडगाई करून जुवेकर यांच्या शिवने येथील बंद घराचे कुलूप तोडले. एवढेच नव्हे तर तुरळ येथील 'जाधव' नामक दांपत्याला बेकायदेशीरपणे त्या घरात भाडेकरू म्हणून ठेवून दिले. या घरात जुवेकर कुटुंबाचे दैनंदिन वापराचे कपडे, महत्त्वाची कागदपत्रे आणि काही मौल्यवान वस्तू आहेत. पोलिस पाटील मनोज शिंदे यांनी यापूर्वीही त्यांच्या पतीला फोनवरून पैशांची मागणी करून धमकावले होते. सध्या ते पीडितेसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला शिविगाळ करत असून सातत्याने धमकावण्याचे काम करत आहेत. त्यामुळे जुवेकर कुटुंब सध्या प्रचंड दहशतीखाली वावरत आहे.
पोलिस पाटलानेच बेकायदेशीर कृत्य केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्मिता जुवेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची विनंती केली असून, या तक्रारीच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे कारवाईसाठी पाठवल्या आहेत. संगमेश्वर तहसील कार्यालयात या अर्जाची नोंद घेण्यात आली आहे.