दापोली : तालुक्यातील हर्णे येथे गोवा किल्ल्यावर दोन तरुणांना लोखंडी शिगेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी १० ते १५ जणांविरोधात हर्णे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेनंतर तालुक्यात तणावपूर्ण वातावरण आहे.
याबाबत चिन्मय सुधीर गुरव (२३, रा. गुरववाडी, हर्णे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते नियमितपणे गोवा किल्ला परिसरात फिरण्यासाठी जात असतात. २६ मे रोजी रात्री ११.३०च्या सुमारास गोवा किल्ल्यावर दोन युवक आरडाओरडा करत असल्याची माहिती ठेकेदार नरेश मोहिते यांनी फोनवरून दिली. त्यानंतर चिन्मय गुरव व त्यांचा मित्र महेंद्र रघुवीर हे दोघे किल्ल्यावर गेले असता दोन युवक सिगारेट ओढताना दिसून आले. त्यांना समज देताच त्यांनी शिवीगाळ केली व तेथून पळ काढला. नंतर बंदर मोहल्ला मशिदीजवळ संबंधित युवक भेटल्यानंतर त्यांनी माफी मागितली व पुन्हा किल्ल्यावर सिगारेट ओढणार नसल्याचे सांगितले. यानंतर घडल्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यात आला होता.
२७ मे रोजी सायं ६.३० च्या सुमारास चिन्मय गुरव व महेंद्र रघुवीर हे दोघे पुन्हा गोवा किल्ल्यावर गेले असता, झैन अस्लम हुंनेकर व मुफिज जावेद सोलकर यांच्यासह ३० ते ३५ युवक तेथे उपस्थित होते. ‘कालचा व्हिडीओ व्हॉट्सॲप ग्रुपवर का टाकला?‘ असा जाब विचारत शिवीगाळ, करत मारहाण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
शिगेने मारहाण केल्याने चिन्मय गुरव यांच्या उजव्या डोळ्याजवळ, हात व पायाला दुखापत झाली असून महेंद्र रघुवीर यांच्या तोंडावर, पाठीत व डोक्यावर मार लागला आहे. चिन्मय गुरव यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोनसाखळी गहाळ झाल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर जखमींना स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, महेंद्र रघुवीर यांना पुढील उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे हलविण्यात आले.हर्णे पोलिस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी झैन हुनेरकर (२२), मुफीज सोलकर (२३), सलाह कोंडविलकर ( १९), नाबील काझी (१९), जैब जमादार (२०) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.