Ratnagiri News : शाळेत मोबाईल नेल्यामुळे पालक ओरडले अन् ८ वी तील मुलीने घेतला धक्कादायक निर्णय! 
रत्नागिरी

Ratnagiri News : शाळेत मोबाईल नेल्यामुळे पालक ओरडले अन् ८ वी तील मुलीने घेतला धक्कादायक निर्णय!

काटवलीतील १२ वर्षीय चिमुरडीने थेट संपवले जीवनच, पालक ओरडल्याचे निमित्त, मुंग्या मारण्याची पावडरच खाल्ली

पुढारी वृत्तसेवा

देवरुख: शाळेत मोबाईल घेऊन गेल्यावरून पालकांनी दिलेला ओरडा मनाला लावून घेत संगमेश्वर तालुक्यातील काटवली येथील अवघ्या १२ वर्षीय आठवीतील विद्यार्थिनीने कीटकनाशक प्राषण करून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी या चिमुकलीने आपल्या आजीचा मोबाईल फोन कुणालाही न सांगता शाळेत नेला होता. सायंकाळी ती घरात आल्यानंतर मोबाईल नेल्याचे समोर येताच पालकांनी तिला यावरून रागवले व समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या रागाच्या भरात चिमुकलीने रात्रीच्या वेळी घरात असलेली मुंग्या मारण्याची पावडर खाल्ली.

​गुरुवारी सकाळी अचानक तिला तीव्र त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.

किरकोळ कारणावरून किंवा ओरडल्याच्या रागातून अल्पवयीन मुलांनी टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मुलांच्या मानसिकतेचा आणि संवादाचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT