चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील सर्वात लांब उड्डाण पुलाचे काम वेगात सुरू आहे. येत्या मार्चअखेरपर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने संबंधित ठेकेदार कंपनीने पावले उचलली आहेत.
बहादूरशेख चौक ते अतिथी हॉटेलपर्यंत उड्डाण पूल होणार आहे. सुरुवातीला अत्याधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाने हा पूल उभारला जाणार होता. मात्र, उभारणी दरम्यानच बहादूरशेख चौक या ठिकाणी हा पूल कोसळला. यानंतर पारंपरिक पद्धतीने या उड्डाण पुलाचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार आधीच्या पिलरमध्ये आणखी एक पिलर टाकून पुलाचे काम सुरू झाले. आता बहुतांश ठिकाणची पिलरची कामे पूर्ण झाली असून त्यावर गर्डर चढवण्याचे कामही 75 टक्के पूर्ण झाले आहे. ज्या भागात गर्डर टाकले आहेत त्या ठिकाणी आता स्लॅबची तयारी करण्यात येत आहे, तर रावतळे भागातील स्लॅबदेखील पूर्ण झाला आहे.
एका बाजूला गर्डर आणि स्लॅबचे काम सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला उड्डाण पुलाच्या ॲप्रोज रोडचे कामदेखील गतीने सुरू करण्यात आले आहे. दोन्ही बाजूंना ॲप्रोच रोडची भिंत आणि मध्ये भरावाचे काम वेगात सुरू झाले आहे. येत्या मार्च 2026 अखेर उड्डाण पुलाचे काम पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.