चिपळूण शहर : मुंबई-गोवा महामार्गावर टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बाप-लेक ठार झाले, तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही दुर्घटना रविवारी रात्री ९.३० वाजता तालुक्यातील वालोपे येथे घडली. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको केला. यामुळे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला.
वालोपे येथील होमगार्ड कुणाल काशीनाथ आग्रे हे आपल्या पत्नी व ४ वर्षांची चिमुकली गार्गीसोबत घरी परतत असताना मागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, चिमुरडी गार्गी जागीच ठार झाली, तर गंभीर जखमी अवस्थेत कुणाल आग्रे यांना रुग्णालयात नेताच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब संपले. दरम्यान, अपघातातील गार्गी हिची आई डेरवण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
या हृदयद्रावक घटनेनंतर वालोपे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. आता किती बळी घेणार? असा सवाल करत शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको करत महामार्ग पूर्ण ठप्प केला. दोन्ही बाजूंना सुमारे ५ कि. मी. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी अनेक प्रवासी ताटकळले, अनेकांची गैरसोय झाली.
वारंवार अपघात होतात, प्रशासन झोपलंय का? स्पीडब्रेकर नाही, दुभाजक नाही, सुरक्षेचे नाव नाही. आमच्या लेकरांचे जीव स्वस्त आहेत का? असे संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केले. अखेर अडीच तासांनी पोलिसांनी समजूत काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. दरम्यान, अपघातानंतर पलायन करणाऱ्या टँकर चालकास ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले व त्याला चांगलाच प्रसाद दिला. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात टँकर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.