संगमेश्वर : तालुक्यातील विविध ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा व धोका निर्माण करणाऱ्या तीन वाहनचालकांविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई २४ जून रोजी करण्यात आली.
पहिल्या प्रकरणात संजय रखमाजी उंडे (४०, रा. आंगवली, देवरूख) याने आपल्या ताब्यातील इको कार (एमएच-०४-केडब्ल्यू-९८७१) संगमेश्वर-चिपळूण मार्गावर सार्वजनिक रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल संकेत आठल्ये यांनी फिर्याद दिली असून गुन्हा क्र. ७७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात सलमान दिलावर खान (३४, रा. फुणगूस मोहल्ला, संगमेश्वर) याने आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-०८-एयू-०१६२) संगमेश्वर बाजारपेठेतील अब्दुल गनी गफार अँड कंपनी दुकानासमोर उभी करून नागरिकांना व वाहनांना अडथळा निर्माण केला. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल गिरीजाप्पा लोखंडे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा क्र. ७८/२०२६ नोंदवण्यात आला आहे.
तिसऱ्या प्रकरणात महेश गंगाराम बांबाडे (५४, रा. लोवले, पडवेवाडी, ता. संगमेश्वर) याने आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-०८-एयू-८६९०) संगमेश्वर नाका परिसरातील मुंबईकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल मधून सखाराम मसकर यांनी फिर्याद दिली असून गुन्हा क्र. ७९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. तीन्ही प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संगमेश्वर पोलिस करत आहेत.