खेड : तालुक्यातील फुरूस गावाला पोयनारशी जोडणाऱ्या रस्त्यावर फळसोंडा जामा मशीद परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघातात विकास चिखलकर (५९, रा. सुतारवाडी, फुरूस) यांचा मृत्यू झाला. ही घटना ३० मे रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास चिखलकर हे त्यांच्या अॅक्टिव्हा दुचाकी (एमएच-०८-ए-०७४१) वरून पाणी आणण्यासाठी फुरूसच्या दिशेने जात होते. फळसोंडा जामा मशीद परिसरात पोहोचताच अचानक एक गाय रस्त्यावर आली. गाय समोर आल्याने त्यांना दुचाकीवरील नियंत्रण राखता आले नाही आणि दुचाकीची गायीला जोरदार धडक बसली.
या भीषण अपघातात चिखलकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे फुरूस परिसरात हळहळ व्यक्त होत असून चिखलकर यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पुढील कार्यवाही संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.