महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : चिपळूणमध्ये एटीएसची मध्यरात्री धाड

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या कथित संपर्काचा संशय : संशयित ताब्यात; मोबाईल, सोशल मीडिया खात्यांची तपासणी

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी कथित सोशल मीडिया संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी मध्यरात्री चिपळूणमध्ये धाड टाकत एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलसह सोशल मीडिया अकाउंट्स, चॅट्स आणि इतर डिजिटल पुराव्यांची कसून तपासणी सुरू असून, या कारवाईमुळे चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तपासाच्या गोपनीयतेमुळे एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी अधिकृत माहिती देण्याचे टाळले आहे. पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टीच्या कथित सोशल मीडिया व डिजिटल 'युजर आयडी'च्या माध्यमातून महाराष्ट्रातील काही युवक संपर्कात असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर एकाचवेळी सुमारे १५० ठिकाणी एटीएसने छापेमारी मोहीम राबवली. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड येथे झालेल्या कारवाईत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे कोकणापर्यंत पोहोचल्याचे समजते. चिपळूणमधील संशयिताच्या मोबाईल, फेसबुक, इन्स्टाग्राम, इतर सोशल मीडिया हँडल्स तसेच कॉल डिटेल्सची तपासणी केली जात आहे. त्याच्या डिजिटल व्यवहारांची आणि संपर्क साखळीची छाननी सुरू असून या चौकशीतून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

अद्याप निष्कर्ष नाही

संबंधित व्यक्तीचा संपर्क केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित होता की त्यामागे गुन्हेगारी अथवा दहशतवादी स्वरूपाचे व्यापक जाळे कार्यरत होते, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. एटीएसचा तपास सुरू असून, अधिकृत माहिती आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील खालापूरसह अन्य ठिकाणीही काही संशयितांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील सोशल मीडिया व्यवहारांवर एटीएसने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT