राजापूर : मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ओणी–अनुस्कुरा मार्गावरील अनुस्कुरा घाटात मध्यरात्री सुमारे एकच्या सुमारास मोठी दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. दरड कोसळून दगड व माती रस्त्यावर आल्याने घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोसळलेली दरड हटवून वाहतूक पूर्ववत सुरु केली.
घटनेची माहिती मिळताच राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने रस्त्यावरील लहान दगड बाजूला करून मध्यरात्रीच एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, रस्त्यावर मोठा दगड होता. तो हटविण्यात आला.
या दरम्यान, परिसरात आणखी दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला असून वाहनचालकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊनच घाटमार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. कोसळलेली दरड हटविल्यानंतर घाट पूर्ववत सुरु झाला होता.